cholesterol consumption | जागतिक आरोग्यात कोलेस्टेरॉल वापराच्या मार्गदर्शक सूचनेवर नवा वाद?  
कोल्हापूर

cholesterol consumption | जागतिक आरोग्यात कोलेस्टेरॉल वापराच्या मार्गदर्शक सूचनेवर नवा वाद?

अमेरिकन संस्थांनी ‘एलडीएल’ कोलेस्टेरॉल पातळीचे निकष बदलले; आयुर्वेद कुचकामी ठरविला : अत्यंत कमी पातळी रुग्णांच्या जीवाला धोका असल्याचा दुसर्‍या गटाचा दावा

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : जागतिक आरोग्यविश्वामध्ये एका नव्या वादाला तोंड फुटण्याची सुरुवात होते आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियॉलॉजी यांच्यासह 9 व्यावसायिक संस्थांनी शुक्रवारी (13 मार्च) हृदयरोग टाळण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यानुसार हृदयविकाराला कारणीभूत ठरणार्‍या वयाच्या 30 व्या वर्षापासूनच कोलेस्टेरॉल नियंत्रणावर भर देण्याची गरज प्रतिपादित केली आहे. तसेच, रक्तातील ‘एलडीएल’ म्हणजेच खराब कोलेस्टेरॉलचे (कमी घनेतेचे मेदप्रथिन) प्रमाण शक्य तितके कमी ठेवण्याची शिफारस करताना बालवयापासूनच कोलेस्टेरॉल तपासणी करणे आणि 30 वर्षांपासून वृद्धापकाळ संपेपर्यंत कोलेस्टेरॉल कमी करण्याचे प्रयत्न जारी ठेवावेत. याखेरीज कोलेस्टेरॉलचे प्रमाण पूर्वी सुचविलेल्या पातळीपेक्षा अधिक कमी ठेवणे आवश्यक असल्याचे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या मान्यवर संस्थांनी जाहीर केलेल्या जगातील वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अभ्यासक हे याविषयी भिन्न मते मांडत आहेत. त्यांच्या मते, रक्तातील ‘एलडीएल’ची पातळी खूप आक्रमकपणे कमी करण्याचे मोठे धोके आहेत. याखेरीज या धोरणाबाबत शंकाही निर्माण होते आहे. त्याखेरीज अमेरिकन संस्थांनी कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या भारतीय आयुर्वेदिक उपचारांवर निरुपयोगी असा शिक्का मारला आहे. यामुळे नजीकच्या काळात हा विषय विवादाच्या पटलावर गाजू शकतो.

अमेरिकन हार्ट असोसिएशनसह 9 संस्थांच्या मते, अमेरिकेत प्रत्येक तीन मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदयरोगामुळे होतो. या हृदयरोगाला रक्तातील ‘एलडीएल’चे वाढलेले प्रमाण कारणीभूत ठरते आहे. रक्तातील वाढलेल्या ‘एलडीएल’मुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यापैकी 80 टक्क्यांहून अधिक आजार टाळता येणे शक्य आहे. यासाठी या संस्थांनी रक्तातील ‘एलडीएल’ची पातळी किती असावी, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यानुसार ‘एलडीएल’ची पातळी 100 पेक्षा खाली असावी, असे स्पष्ट करताना पुढील 10 वर्षांत हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूत रक्तस्राव होण्याचा 10 टक्के किंवा अधिक धोका असलेल्या व्यक्तींनी ‘एलडीएल’ची पातळी 70 पेक्षा कमी ठेवावी आणि ज्यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा रक्तवाहिन्यांचा आजार आहे, त्यांनी ही पातळी 55 पेक्षा खाली ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

या संस्थांच्या वतीने केलेल्या शिफारशींमध्ये स्टीव्हन निसेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय आयुर्वेदाद्वारे ‘एलडीएल’ कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या फिश ऑईल, दालचिनी, हळद, पांढरा तांदूळ आणि वनस्पतीजन्य औषधी या सहा सप्लिमेंटच्या क्लिनिकल चाचण्यांचा निष्कर्ष दिला आहे. ही औषधे केवळ मानसशास्त्रीय (प्लॅसिबो) परिणामांखेरीज मूळ रोगावर किंचितही गुणकारी ठरत नाहीत, असेही या संस्थांचे म्हणणे आहे. अमेरिकन हार्ट इन्स्टिट्यूट आणि अमेरिकन सोसायटी ऑफ कार्डियॉलॉजी यांच्यासह 9 संस्थांनी काढलेल्या या निष्कर्षावर जगातील वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक आणि सार्वजनिक क्षेत्रातील अभ्यासक यांची दुसरी बाजूही भक्कम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT