कोल्हापूर : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात करिअरविषयक गोंधळाची स्थिती व पुढील करिअरचे टेन्शन असते. हेच टेन्शन दूर करण्यासाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी दै. ‘पुढारी’ने मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, सोमवारी (दि. 23) कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजता सुरू होणार्या या सेमिनारमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आर्टस्, कॉमर्स, सायन्ससह विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांविषयी सविस्तर आणि विनामूल्य माहिती दिली जाणार आहे.
एक काळ असा होता की, दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर फारसे पर्याय उपलब्ध नसायचे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडणे सर्वात कठीण होते. आपण कोणता विषय किंवा अभ्यासक्रम निवडावा, जो आपले भविष्य घडवण्यास मदत करेल, या विचाराने विद्यार्थी तणावात असायचे; आज विद्यार्थ्यांसमोर करिअरची अनेक क्षेत्रे खुली आहेत. त्यामधून योग्य करिअर निवडणे विद्यार्थ्यांसाठी कठीण जाते. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार करिअर कसे निवडू शकतात? यासह अन्य क्षेत्रांतील करिअरच्या संधीबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी योग्य करिअर निवडणे हे एक आव्हान बनले आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रापलीकडेही संधीची कवाडे खुली झाली आहेत. या बदलत्या काळात आपल्या आवडीनुसार आणि भविष्यातील मागणीनुसार योग्य अभ्यासक्रम कसा निवडावा, याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ दूर करणे हा या सेमिनारचा मुख्य उद्देश आहे.
इंजिनिअरिंग, डिझाईनिंग, आर्किटेक्चर, फार्मसी, मीडिया, एमबीए अशा विविध क्षेत्रांतील संधी, सीईटी आणि अन्य प्रवेश प्रक्रियांची माहिती व त्यासाठी लागणारी कागदपत्रे. ‘पीसीएम’ ग्रुपमध्ये 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले पर्याय. शैक्षणिक कर्ज, स्कॉलरशिप योजना आणि मागील वर्षाचे कॉलेज कट-ऑफ. भविष्यातील तंत्रज्ञान असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगमधील करिअरच्या संधी, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर ‘बारावीनंतरच्या संधी’ यावर, नूतन महाराष्ट्र ग्रुपचे सीईओ डॉ. आर. एस. जहागीरदार ‘सीईटी प्रवेश प्रक्रिये’वर, तर पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक डॉ. सागर पांडे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशिन लर्निंगमधील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, दहावी आणि बारावीमध्ये 80 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ‘गुणवंत विद्यार्थी गौरव 2025’ या पुरस्काराने दै. ‘पुढारी’तर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सेमिनारमधील सहभागासाठी आणि गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी व पालकांनी https:/// forms. gle/ YujudofRxMwPso829 या लिंकवर किंवा बातमीत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 9834433274 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. प्रवेश विनामूल्य आहे.