kolhapur | महापौरांसह पदाधिकार्‍यांच्या दिमतीला आता न्यू ब्रँड कार 
कोल्हापूर

kolhapur | महापौरांसह पदाधिकार्‍यांच्या दिमतीला आता न्यू ब्रँड कार

महापालिका प्रशासन खरेदी करणार 80 लाखांची 6 वाहने

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर, उपमहापौरांसह इतर पदाधिकार्‍यांना आत न्यू ब्रँड कार मिळणार आहेत. सुमारे 80 लाखांची सहा वाहने घेण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला असून, पुढील आठवड्यात पदाधिकार्‍यांना वाहने दिली जाणार आहेत.

कोल्हापूर शहराच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी आणि पदाधिकार्‍यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन वाहनांचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील विविध विकासकामे, पाहण्या, आपत्कालीन भेटी आणि प्रशासकीय समन्वय अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, परिवहन सभापतींना केएमटीच्या बजेटमधून, तर शिक्षण मंडळ सभापतींना त्यांच्या बजेटमधून वाहने घेतली जाणार आहेत.

सध्या महापालिकेकडे असलेली बहुतांश वाहने जुनी झाली आहेत. अनेकवेळा कामाच्या वेळेत ही वाहने बंद पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे कामकाजात विलंब होतो. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पदाधिकार्‍यांना सतत शहरात फिरावे लागते. त्यामुळे सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहनांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच नवीन वाहन खरेदीचा निर्णय घेतला आहे. महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर यांच्यासह स्थायी समिती सभापती, सभागृह नेता आणि महिला व बालकल्याण समिती सभापतींना वाहने खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या द़ृष्टीने हा निर्णय दीर्घकालीन गुंतवणूक मानला जात आहे. नवीन वाहने असल्यामुळे दुरुस्ती खर्च कमी होईल, वेळ वाचेल आणि पदाधिकार्‍यांचे दौरे अधिक नियोजनबद्ध पद्धतीने होऊ शकतील. यामुळे नागरिकांच्या तक्रारींवर जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. शहरातील विकासकामे, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा, रस्ते कामे, तसेच इतर नागरी सुविधा यांचे प्रत्यक्ष पाहणी दौरे अधिक नियमितपणे होऊ शकतील. मजबूत प्रशासकीय यंत्रणा आणि कार्यक्षम समन्वय यामुळे शहर विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेचे कामकाज अधिक गतिमान करण्याच्या द़ृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT