कोल्हापूर

कोल्हापूर : शिवाजी पुलाला अवकळा…

Arun Patil

कोल्हापूर, आशिष शिंदे : आणखी पाच वर्षांनी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणार्‍या पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक शिवाजी पुलाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या पुलाच्या देखभालीकडे लक्ष दिले नाही तर त्याचे दगड खिळखिळे होण्याचा धोका आहे. हा वारसा जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आता लक्ष दिले नाही तर त्याची होणारी पडझड थांबवणे अवघड आहे. पुलावर लाईट अँड साऊंड शो, हेरिटेज वॉक करण्याचा प्रस्ताव अद्याप कागदावरच आहे.

कोल्हापूरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत 1874 साली पुलाचे बांधकाम सुरू केले. आज सर्व साधनसामग्री डिजिटल यंत्रणेसह उपलब्ध असताना रस्ते, धरण आणि पुलाची कामे वर्षानुवर्षे रेंगाळतात. मात्र मोजक्या साधनसामग्रीसह या पुलाचे काम नियोजित वेळेत चार वर्षांत पूर्ण झाले आणि पूल वाहतुकीस खुला झाला.

सुमारे 141 वर्षे हा पूल अखंड सेवा देत राहिला. 31 मे 2019 ला नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाली. यानंतर शिवाजी पुलाचा हेरिटेज वॉकसह पर्यटनासाठी उपयोग केला जाणार असल्याच्या घोषणा झाल्या. मात्र त्याकडे आजअखेर दुर्लक्षच झाले. एवढेच नव्हे तर आता पुलाच्या दोन्ही बाजूला अनेक प्रकारची वाढलेली झाडे पुलाच्या कमानीचे दगड खिळखिळे करण्यास पुरेशी आहेत. त्यामुळे पुलाचे अस्तित्व आणि सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

शिवाजी पुलाचे जतन आता जनतेच्या हाती

पुलाच्या दोन्ही बाजूला वाढणारी झाडे वेळोवेळी काढणे, पुलाला आलेली अवकळा संपवणे, पूल कायमस्वरूपी स्वच्छ ठेवणे, तेथे साचलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे, त्याचबरोबर दिवे लावण्यासाठी असलेल्या संस्थानकालीन नक्षीदार खांबांचे निखळलेले दगड व्यवस्थित करणे, पुलाचे सुटलेले दगड सांधणे ही कामे करावी लागतील. प्रशासनाने दुर्लक्ष केले, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. आता कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT