कोल्हापूर : एअरफोर्सच्या विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर आलेले नीट परीक्षेचे पेपर पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. 
कोल्हापूर

NEET Exam | एअरफोर्सच्या विशेष विमानाने आले ‘नीट’चे पेपर

२१ जूनला होणार पुनर्परीक्षा; पोलिस बंदोबस्तात पेपर बँकांच्या कस्टडीत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षा येत्या रविवारी (दि.२१) पुन्हा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी सरकारने प्रचंड दक्षता घेतली आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या केंद्रांसाठी परीक्षेचे पेपर एअरफोर्सच्या (हवाई दल) विशेष विमानाने सोमवारी (दि.१५) कोल्हापुरात दाखल झाले. विमानतळावरून पोलिस बंदोबस्तात हे पेपर बँकांच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहेत.

‘नीट’ची मे महिन्यात झालेली परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याने रद्द करण्यात आली. यावरून देशभर प्रचंड गोंधळ उडाला. रद्द केलेली ही परीक्षा आता दि.२१ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटे अशा सव्वातीन तासांच्या कालावधीत होत आहे.

‘नीट’च्या पुनर्परीक्षेेसाठी सरकारने दक्षता घेतली असून पेपर पोहोचवण्यासाठी एअर फोर्सच्या विमानाची मदत घेतली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांसाठी पेपर घेऊन आलेले एअरफोर्सचे विशेष विमान सोमवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यानंतर कोल्हापूर आणि सांगली केंद्रांसाठीचे पेपर देऊन हे विमान सोलापूरसाठी रवाना झाले. धावपट्टीवरूनच पोस्ट विभागाच्या वाहनांत सीलबंद पेट्या घेण्यात आल्या. यानंतर पोलिसांच्या एका ताफ्यातून पेपर सांगलीसाठी नेण्यात आले. दुसरा ताफा कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरातील दोन बँकांच्या कोषागारात गेला. याठिकाणी बंदोबस्तात पेपर ठेवण्यात आले. रविवारी सकाळी पोलिस बंदोबस्तातच हे पेपर बाहेर काढून परीक्षा केंद्रांवर नेण्यात येणार आहेत. यावेळी पोस्टाचे प्रवर अधीक्षक वैभव वाघमारे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT