कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘मनरेगा’ योजनेचे नाव बदलण्याचा भाजप सरकारने घाट घातला आहे. याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने बुधवारी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ. सतेज पाटील यांनी ‘मनरेगा’च्या माध्यमातून महात्मा गांधी यांची चिरंतन आठवण देशभरातील गोरगरिबांसाठी होती, तेच पुसण्याचे पाप भाजपने केले आहे. बहुमताच्या जोरावर या देशात आम्ही काही करू शकतो, हे भाजप दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
महात्मा गांधी यांच्या नावाने दीर्घकाळ सुरू असलेल्या ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलून विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि अजिविका मशिन करण्याचे विधेयक संसदेत सादर केले आहे. याला काँग्रेसह सर्वच विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. याच्या विरोधात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात बुधवारी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर इंडिया आघाडीच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन पुकारले होते. या आंदोलनासाठी सकाळपासून पापाची तिकटी येथे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमत होते. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात माजी आ. ऋतुराज पाटील, शिवसेना उबाठा उपनेते संजय पवार, विजय देवणे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, कॉम—ेड उदय नारकर, चंद्रकांत यादव, बबन रानगे, अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, भारती पोवार, तौफिक मुल्लाणी, राजू लाटकर, सचिन चव्हाण, भूपाल शेटे, खंडू कांबळे आदी सहभागी झाले होते.