कोल्हापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांना त्यांच्या हक्काच्या सातवे आणि पोर्ले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. मात्र, दुसरीकडे कोडोली, कुंभोज आणि टोप परिसरात जनसुराज्यने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
सातवे आणि पोर्लेत राष्ट्रवादीचा गुलाल
आमदार विनय कोरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. पोर्ले येथे राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्व जागांवर आपले वर्चस्व निर्माण केले. कोरे यांच्यासाठी हा या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तर सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विजय मिळवला. तसेच सातवे आणि माले या दोन्ही पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
कोडोली आणि कुंभोजमध्ये जनसुराज्यचा झेंडा
एकीकडे काही जागा हातच्या गेल्या असल्या तरी, जनसुराज्यने इतर महत्त्वाच्या मतदारसंघांत आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील यांनी विजयश्री खेचून आणली. कुंभोज जि.प. मध्ये जनसुराज्यच्या शीतल प्रवीण यादव यांनी १९७४ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला.
पंचायत समितीमध्ये 'जनसुराज्य'ची मुसंडी
पंचायत समितीच्या निकालांमध्ये जनसुराज्यने आपले अस्तित्व प्रभावीपणे सिद्ध केले आहे. टोप पं.समितीमध्ये जनसुराज्यचे मुकूंद पाटील यांनी ३३२३ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली. घुणकी पं.समिती मतदारसंघातून जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते विजयी झाल्या आहेत.