Gokul Dairy Election | एक आमदार असलेली राष्ट्रवादी जिल्‍ह्यात महायुतीत ठरतेय भारी! 
कोल्हापूर

Gokul Dairy Election | एक आमदार असलेली राष्ट्रवादी जिल्‍ह्यात महायुतीत ठरतेय भारी!

‘गोकुळ’च्या जागावाटपात सर्वाधिक जागांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्‍हापूर : महायुतीच्या राज्यातील सत्तासमीकरणात भाजपचे वर्चस्व असले, तरी कोल्हापूर जिल्ह्याच्‍या राजकारणात राष्‍ट्रवादी काँग्रेस महायुतीत भारी पडत आहे. केवळ मंत्री हसन मुश्रीफ हे एकटेच आमदार असले, तरी ‘गोकुळ’ निवडणुकीच्‍या निमित्ताने राष्ट्रवादीने आपले राजकीय वजन दाखवून दिले आहे. सर्वाधिक ठराव संख्‍येचा राजकीय दबाव टाकत जागावाटपात महायुतीत सर्वाधिक जागांची मागणी मुख्‍यमंत्र्यांसोबत झालेल्‍या बैठकीत केली. मंत्री मुश्रीफ यांनी त्‍यांचे राजकीय वजन सिद्ध केले असले, तरी जागा वाटपाबाबत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस काय फॉर्म्युला ठरवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

‘गोकुळ’च्या २५ जागांसाठी महायुतीतील राष्ट्रवादीने १०, भाजप व शिवसेनेने प्रत्येकी आठ, तर जनसुराज्य शक्तीने तीन जागांची मागणी केली आहे. त्यामुळे २५ जागांसाठी एकूण २९ जागांची मागणी पुढे आली असून, जागावाटपाचा तिढा कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही यावर अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे एक आमदार असलेला राष्ट्रवादी पक्ष ‘गोकुळ’च्या निमित्ताने महायुतीत किती राजकीय वजन निर्माण करतो, हाच सध्या कोल्हापूरच्या राजकारणातील प्रमुख चर्चेचा विषय आहे.

भाजपची धडपड, शिवसेनेचा समन्‍वय

‘गोकुळ’मध्‍ये महायुतीत वर्चस्‍व निर्माण करण्‍यासाठी मुख्‍यमंत्र्यांच्‍या माध्‍यमातून भाजपची धडपड सुरू आहे. भाजपकडे जिल्‍ह्यात एक राज्यसभा खासदार, दोन पक्षाचे आमदार, एक अपक्ष आणि दोन सहयोगी आमदार अशी लोकप्रतिनिधींची संख्‍या असूनही सहकारात भाजपला झटावे लागत आहे. तर शिवसेनेकडे पालकमंत्री, खासदार, सहयोगीसह तीन आमदार अशी संख्‍या आहे. तरीही ‘गोकुळ’मध्‍ये समन्‍वयाची भूमिका असल्‍याचे सांगत शिवसेनेने ठरावीक मर्यादेत स्‍वत:ला बांधून घेतल्‍याचे दिसून येत आहे.

मंत्री मुश्रीफ, आ. कोरे केंद्रस्‍थानी

मुश्रीफ यांनी जि.प. निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना अनेक धक्‍के दिले. आ. विनय कोरे यांच्‍या बालेकिल्‍ल्‍यात प्रवेश करत त्यांना अस्‍वस्‍थ केले. याचे पडसाद जि.प. अध्‍यक्ष निवडीत दिसले. मात्र ‘गोकुळ’ निवडणुकीत या दोन्‍ही नेत्‍यांनी मिळतेजुळते घेतले आहे. महादेवराव महाडिक, स्‍व. आ. पी. एन. पाटील आणि आ. सतेज पाटील गटाभोवती फिरणार्‍या ‘गोकुळ’च्‍या राजकारणात आता मुश्रीफ व काेरे केंद्रस्‍थानी आल्‍याचे दिसून येत आहे.

‘गोकुळ’मध्‍ये स्‍थान केले निर्माण

‘गोकुळ’मध्‍ये यापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक, स्‍व. आ. पी. एन. पाटील आणि माजी चेअरमन अरुण नरके यांची एकहाती सत्ता होती. याकाळात मुश्रीफ महाडिक यांच्‍यासोबत सत्तेत होते. मागील निवडणुकीत ते आ. सतेज पाटील यांच्‍यासोबत सत्तेत आले; पण आता मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’मध्‍ये त्‍यांचे स्‍वत:चे स्‍थान निर्माण केले आहे. महाडिक, पाटील गटाला बाजूला करत मंत्री मुश्रीफ ‘गोकुळ’च्‍या केंद्रस्‍थानी आले आहेत. जिल्‍हा परिषद, गोकुळ, जिल्‍हा बँक, बाजार समिती, शेतकरी संघ अशा स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आणि सहकारी संस्‍थांची सत्ता हातामध्‍ये ठेवत मंत्री मुश्रीफ यांनी महत्त्‍व अधोरेखित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT