कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बेठकीत बोलताना आमदार शशिकांत शिंदे, सोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे, बाजीराव खाडे, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार आदी. Pudhari File Photo
कोल्हापूर

सहकार्य नसेल तर स्वबळाची तयारी ठेवा : आ. शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आपण आघाडी धर्म पाळत आहोत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहकार्य करत नसतील तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची तयारी ठेवा. आपल्या शिवाय कोणाला सत्ता स्थापन करता येणार नाही अशी ताकद निर्माण करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे निरीक्षक आ. शशिकांत शिंदे यांनी केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी जमवायला आम्ही आणि पदाला भोवती पिंगा घालणारे हे बंद करावे, असे निरीक्षकांना ऐकविले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, जनतेच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घ्या. अधिकारी तुमचे ऐकत नसतील तर त्यांना सरळ करण्यासाठी आम्ही येऊ. जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावरची लढाई सुरू करावी. जनसंपर्क अभियान राबवून पक्ष संघटन मजबूत करत सभासद नोंदणी वाढवावी, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील संदर्भ पाहून निर्णय घेण्याचे अधिकार जिल्ह्याला द्यावेत, असे समरजित घाटगे यांनी सांगितले. माजी आमदार राजीव आवळे यांनी, पक्षाने विधानसभा लढविली त्याच मतदारसंघात लक्ष न देता सर्व मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या नेत्यांनी बैठका घ्यावी, असे सांगितले. रामराजे कुपेकर यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाभोवती पिंगा घालणार्‍या कार्यकर्त्यांना पदे दिली जातात, असा आरोप केला. यावेळी आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई, उदयसिंह पाटील, शुभांगी पडवळकर, संभाजीराव पोवार, रोहित पाटील आदींची भाषणे झाली. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले.

कागल तालुक्याला वगळा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर त्यातून कागल तालुक्याला मात्र वगळावे, असे शिवानंद माळी यांनी सांगताच हर्षवर्धन पाटील म्हणाले, कागलचा पॅटर्न प्रसिद्ध आहे.

गद्दाराचे नाव घेऊ नका

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांना साथ दिली. त्याचा उल्लेख अनिल घाटगे यांनी केला. त्याला आक्षेप घेत जयकुमार शिंदे यांनी, त्यांचे नाव घेऊ नका असे म्हणताच एक कार्यकर्ता ओरडला, गद्दाराचे नाव घेऊ नका. त्याला कार्यकर्त्यांनीही साथ दिली.

हद्दवाढीबाबत राष्ट्रवादीतही मतभेद

हद्दवाढीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आले. शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी केली. त्याला माजी आमदार राजीव आवळे यांनी आक्षेप घेत हद्दवाढीला आमचा विरोध असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT