मुंबई : पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रताप ऊर्फ भैया माने यांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आ. डॉ. विनय कोरे व जनसुराज्य पक्षाचे समित कदम. 
कोल्हापूर

Pune Graduate Constituency Elections | राष्ट्रवादी काँग्रेसचे भैया माने यांचा डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर महायुतीच्या एकसंधपणासाठी माघारीचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे / कागल : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते प्रताप ऊर्फ भैया माने यांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असतानाही पक्षहिताला प्राधान्य देत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत स्मिता जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भैया माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संपूर्ण मतदारसंघात दौरे करून पदवीधर मतदारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांनी नोंदणी मोहिमेला गती दिली होती. पदवीधर मतदारांची विक्रमी नोंदणी आणि कार्यकर्त्यांचे संघटन यामुळे ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात होते.

उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा या जागेवरील उमेदवारीचा नैसर्गिक हक्क असल्याची भावना समर्थकांमध्ये होती. त्यातूनच कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

गतवेळी निवडून आलेल्या लाड यांचे चिरंजीव भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे महायुतीच्या जागावाटपाचे समीकरण बदलल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आ. डॉ. विनय कोरे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैया माने यांना मुंबईत बोलावून चर्चा केली. कागलच्या भविष्यातील विकासाची हमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माने यांना दिली. यानंतर मंत्री मुश्रीफ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आ. कोरे, समित कदम यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात भैया माने म्हणाले, मी मुळातच कार्यकर्ता असून विचारांशी बांधिलकी जपणारा आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदारांची नोंदणी केली. या निवडणुकीत लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा पवार यांच्याकडे मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मागितली होती. परंतु आपण महायुतीत असल्यामुळे त्यांनी या मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत बोलावून चर्चा केल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षहिताचा विचार करून मी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, असे सांगून ते म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख कार्यकर्ता असून अजितदादांच्या विचारांचा मी कार्यकर्ता आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवार सौ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. पक्षनिष्ठा कायम ठेवत भैया माने यांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला बळ मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT