मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील व शिवसेना जिल्हाध्यक्ष, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश झाला.  (Pudhari File Photo)
कोल्हापूर

NCP Kolhapur News | कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त होईल : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

रणजितसिंह पाटील, राजेखान जमादार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

पुढारी वृत्तसेवा

मुदाळतिट्टा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सर्वांना आपलेपणाने सोबत घेऊन जाण्याची हातोटी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणण्याची किमया ते करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळ मिळत आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढले. कोल्हापूर जिल्ह्याची ही प्रेरणा घेऊन राज्यभरात राजकीय परिवर्तनाची किमया सुरू आहे, असेही ते म्हणाले.

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील व शिवसेना- एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार. तटकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी मंत्री हसन मुश्रीफ होते.

तटकरे म्हणाले, बहुजन समाजाचे हित साधायचे असेल तर सत्तेमध्ये सहभाग ठेवला पाहिजे, हा विचार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिला. त्यामुळे सन 2023 मध्ये एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र घडणार आहे. श्री. पाटील व श्री. जमादार हे विकासाचा दृष्टिकोन ठेवून पक्षामध्ये आले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे केवळ कागलच नव्हे तर जिल्ह्यातील पक्षाची ताकद अधिकच मजबूत झाली आहे. कोल्हापूर जिल्हा हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेची विचारधारा जपणारा पुरोगामी जिल्हा आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यामुळे पक्षाला बुलडोझर आणि जेसीबीचे बळ मिळाले आहे. पक्षात येऊन चूक केली असे त्यांना वाटणार नाही, असा योग्य तो मानसन्मान आणि विश्वासही देवू. उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याची मी शपथ घेतली आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष असेल.

दिल्या घरी सुखी राहा...

मंत्री श्री. मुश्रीफ प्रवीणसिंह पाटील यांचे नाव न घेता म्हणाले, श्री. रणजीतसिंह पाटील व श्री. राजेखान जमादार यांच्या प्रक्ष प्रवेशाची चर्चा सुरू होती. मी त्यांना सांगत होतो की, ते आमच्याकडे आहेत मी त्यांचा विश्वासघात करणार नाही. मी त्यांना कन्व्हिन्स करीन. परंतु; आई अंबाबाई आणि श्री. बाळूमामा यांच्याच मनात असावं. त्यामुळेच ते गेले आणि हे आले. मी काही त्यांना जा म्हटले नाही. ते का गेले हे कोडे मला पडलेले आहे. आत्ता या विषयावर मी पुन्हा बोलणार नाही. दिल्या घरी सुखी रहा, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा....!

गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील म्हणाले, “माझं आयुष्य गोकुळच्या कामगिरीशी अतूटपणे जोडलेलं आहे. गोकुळच्या स्थापनेपासून मी संचालक मंडळाचा भाग होतो आणि जवळपास ४३ वर्षे मी गोकुळमध्ये संचालक म्हणून कार्यरत राहिलो. या काळात गोकुळला सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे, दूध उत्पादकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवणारे निर्णय घेता आले, हीच माझ्यासाठी खरी शिदोरी आहे.

राजकीय अपरिहार्यतेमुळे काही काळ मी मंत्री मुश्रीफ यांच्यापासून दूर होतो, मात्र यापूर्वीच्या सर्वच निवडणुकांमध्ये मी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलं. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं नेतृत्व माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायक राहिलं आहे. त्यांच्या विजयात माझाही एक खारीचा वाटा आहे, याचा मला अभिमान वाटतो. आज मी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. माझ्यासाठी नवीन जबाबदारी आणि नवीन प्रेरणा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचं प्रामाणिक नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि कार्यक्षम प्रशासकीय धोरणं ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत.

आगामी मुरगूड नगरपरिषद निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी घोडदौड कायम राहावी, यासाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून देणार आहे. पक्षाच्या प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक रणनितीत माझा सक्रिय सहभाग राहील. गटातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हेच माझं ध्येय राहील.

मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले,"आयुष्यात अनेक चुका झाल्या. काही निर्णय चुकले, काही वेळा परिस्थिती विपरीत होती. त्याचंच फलित म्हणजे १२ वर्षांचा वनवास माझ्या वाट्याला आला. हा काळ कठीण होता, पण त्यातून खूप काही शिकायला मिळालं. आज मुश्रीफ साहेबांसोबत पुन्हा उभा राहिलोय, हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. त्यांनी गोरगरीब, वंचित, निराधारांसाठी जे कार्य केलं आहे, ते खरंच अद्वितीय आहे. अशा नेतृत्वाखाली काम करण्याची परत एकदा संधी मिळणं, हा माझ्यासाठी सन्मान आहे. कोल्हापूर जिल्हा आज राष्ट्रवादीमय होतोय. कारण; लोकांना मुश्रीफ साहेबांसारख्या नेत्यावर विश्वास वाटतो. आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला, त्याला मी पात्र जीवात जीव आहे तोवर मुश्रीफ साहेबांबरोबर राहणार आहे.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, संजय तटकरे, सिद्धार्थ कांबळे, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी नगरसेवक नामदेव भांदिगरे, सुनील चौगुले, रणजित मगदूम दत्ता पाटील - केनवडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांच्यासह बजरंग सोनुले, संतोष वंडकर, अशोक खंडागळे, दत्तात्रय जाधव, किरण कुंभार, पद्मसिंह पाटील, विश्वजीतसिंह पाटील, संभाजी पाटील - बेलवळे बुद्रुक, मधुकर करडे - नंद्याळ, दत्तात्रय पाटील - बेलवळे खुर्द, बबन शिंत्रे बाजीराव चांदेकर, आर. के. लाडगावकर - अर्जुनवाडा, आनंदा थोरवत - कुरणी, अनिल पाटील, तसेच माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यासह माजी नगरसेवक विशाल सूर्यवंशी, अमर सनगर, सचिन मेंडके, राजेंद्र भारमल, बबन मोरबाळे, आकाश दरेकर, प्रकाश हळदकर, समाधान बोते, राजेंद्र खैरे, फिरोजखान जमादार, विक्रमसिंह घाटगे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी केले. सूत्रसंचालन लतीफ तांबोळी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT