कागल : जि. प. व पं. स. उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे व उपस्थित कार्यकर्ते. 
कोल्हापूर

kolhapur | महाराष्ट्रात इतिहास होईल, असा विजय घडवा

मंत्री मुश्रीफ, संजय घाटगे व समरजित घाटगे यांचे आवाहन : कागलमध्ये राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

पुढारी वृत्तसेवा

कागल : मी, माजी आमदार संजय घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरसजत घाटगे, अशी विधायक वळणावर युती झालेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन आम्ही घेतलेला निर्णय सार्थ आहे हे दाखवून द्या. महाराष्ट्रात इतिहास होईल असा उच्चांकी विजय घडवा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

पंचायत समिती, जिल्हा परिषद पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा गहिनीनाथनगर पटांगणात संपन्न झाला. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, गावागावांत विकासाचे काम, गोरगरिबांचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि जनतेच्या आशा-आकांक्षा फलद्रूप व्हाव्यात या इच्छेने आम्ही एकत्र आलो आहोत. कुणाला एकटे पडण्यासाठी आम्ही तीन गट एकत्र आलेलो नाही. याचा बाक काढतो, त्याचा बाक काढतो, असे न म्हणता काम करा. नाहीतर तुमचाच बाक निघेल. अधिकृत केलेले सोडून आमच्यावर निष्ठा असलेल्या सगळ्या उमेदवारांनी उद्या संध्याकाळी माघार घ्यावी. आमची इच्छा होती, त्यांनीही आमच्यात यावे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक नेहमी सांगायचे, आता आम्हाला सोडून जाणार्‍यांची भेट थेट स्वर्गात. आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि स्वच्छता याला प्राधान्य असले पाहिजे. वटा फाटून जाईल इतका निधी मी मिळवून देईन. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे. मनामध्ये कसलेही मतभेद, किल्मिष ठेवू नये. ‘तुम हमे पंधरा दिन दो, हम तुम्हे भर भर के देंगे’, असा नारा त्यांनी दिला.

समरजित घाटगे म्हणाले, कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो. कागलप्रमाणे या निवडणुकीतील सर्व उमेदवार राज्यात उच्चांकी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करूया. सोयीची राजकीय भूमिका घेणार्‍यांचा व ज्या-त्या गटाशी प्रामाणिक राहणार्‍या कार्यकर्त्यांचा वेगळा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, युतीचा हा दिवस बघायला स्वर्गीय कै. विक्रमसिंह घाटगे असते तर धन्य झाले असते. जनसामान्यांचा विकास करावा, माता-बहिणींचे अश्रू पुसावे. यासाठी युती आहे. मुश्रीफ यांची हवा आणि समरजित घाटगे यांचे नाव सगळीकडे निघाले पाहिजे, असे मताधिक्य 18 उमेदवारांना मिळाले पाहिजे. जनतेला चांगले दिवस यावे यासाठी तिघांनी घेतलेला हा निर्णय आहे.

धूल चेहरे पे थी!

प्रा. संजय मंडलिक यांच्या नावाचा उल्लेख न करता मंत्री मुश्रीफ म्हणाले, आम्ही त्यांनाही युतीसाठी निमंत्रण दिले होते. परंतु ते घडले नाही. ते भविष्यात घडेल अशी अपेक्षा करूया. दरम्यान गालीब उम—भर भूल करता रहा, धूल चेहरे पर थी, लेकीन आईना साफ करता रहा, असा शेरही त्यांनी म्हटला.

यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजित पाटील, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम, राजेंद्र भोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने यांनी केले. प्रास्ताविक विजय काळे यांनी केले. यावेळी वीरेंद्रसिंह घाटगे, नवीद मुश्रीफ, रणजितसिंह पाटील, युवराज पाटील, एम. पी. पाटील, नगराध्यक्ष सौ. सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, सूर्यकांत पाटील, कृष्णात पाटील, राजेखान जमादार, धनराज घाटगे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT