कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखतींना शाहू मार्केट यार्डमधील पक्षाच्या कार्यालयात शनिवारपासून प्रारंभ झाला. इच्छुकांची गर्दी झाली होती. पहिल्या दिवशी 6 तालुक्यांतील 463 मुलाखती घेण्यात आल्या. रविवारी उर्वरित तालुक्यातील गट व गणांमधील मुलाखती होणार आहेत. इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी केले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जि.प. माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, मानसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. जिल्हा परिषदेसाठी करवीर तालुक्यातून 32, कागल 39, हातकणंगले 21, शाहूवाडी 12, पन्हाळा 19 व गगनबावडा तालुक्यांतून 5 इच्छुकांचा समावेश आहे. रविवारी (दि.11) राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज व शिरोळ या तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.
क्रांतिसिंह पाटील, राजू सूर्यवंशी घड्याळ हातात बांधणार
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पाटील यांनी सडोली (ता. करवीर) जि.प. मतदारसंघासाठी इच्छुक म्हणून मुलाखत दिली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी त्यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार काय, असे विचारले असता त्यांनी होकार दिला. काँग्रेसचे राजू सूर्यवंशी हे देखील मुलाखतीसाठी हजर होते.