कोल्हापूर : वाढत्या तापमानाने होरपळणार्या कोल्हापूरचा पारा 41 अंशांवरून 36 अंशांवर आणण्याचे ध्येय घेऊन ‘आझाद हिंद नेचर आर्मी’ने सुरू केलेल्या पर्यावरण चळवळीला आता राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) मोठे बळ मिळाले आहे. फाईव्ह महाराष्ट्र बटालियनचे सर्व एनसीसी विद्यार्थी वर्षभरात जास्तीत-जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहतील, अशी ग्वाही बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित यांनी दिली.
आझाद हिंद नेचर आर्मीच्या वतीने कोल्हापूर ग्रुप एनसीसी भवन येथे नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी ‘आझाद हिंद’चे अध्यक्ष राहुल मगदूम होते. याप्रसंगी कर्नल मानस दीक्षित, कर्नल सुहास काळे, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आणि राहुल मगदूम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कर्नल दीक्षित यांनी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून, एनसीसीचे कॅडेटस् या सामाजिक जबाबदारीसाठी नेहमीच अग्रभागी राहतील, असे सांगितले. या कार्यक्रमास सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले, अमर भोसले, परितोष उरकुडे, शिवाजी विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक अभिजित जाधव यांच्यासह एनसीसीचे विविध अधिकारी, जेसीओ, पीआय स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.