Navratri festival | नवरात्रौत्सवास उद्यापासून प्रारंभ Pudhari File Photo
कोल्हापूर

Navratri festival | नवरात्रौत्सवास उद्यापासून प्रारंभ

महालंकार पूजा, पालखी व नव्या एआय तंत्रज्ञानाची जोड

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक करवीरनिवासिनी श्री अंबाबाईदेवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला सोमवार, दि. 22 सप्टेंबरपासून उत्साहात सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने व विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. नवरात्रौत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होणार असून, आश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी 7.30 वाजता मंत्रोच्चार, मंगलवाद्यांच्या गजरात घटस्थापना होईल. त्याआधी सकाळी 6.30 ते 8.30 व साडेअकरा वाजता देवीचा नित्य पूजाभिषेक होणार आहे. सकाळी 9 वाजता तोफेची सलामी देत शारदीय नवरात्र सोहळा सुरू होईल.

यंदाचा नवरात्रौत्सव दहा दिवसांचा

करवीर निवासिनी अंबाबाईदेवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला सोमवार, दि. 22 सप्टेंबरपासून प्ररंभ होत असून यावर्षी नवरात्रौत्सव दहा दिवसांचा असणार आहे. अंबाबाईची पूजा तिच्या दशमहाविद्या रूपांपैकी सात प्रभावशाली रूपांमध्ये बांधण्यात येणार आहे.

उत्सवकाळात रोज दिवसभरात विविध नित्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजता देवीची महालंकार पूजा, रात्री 9.30 वाजता देवीच्या सुवर्ण पालखीचा भव्य सोहळा होईल. प्रत्येक दिवशी देवीची वेगवेगळ्या रूपांत सालंकृत पूजा केली जाणार आहे. पालखी मिरवणूक, महापूजा, अंबाबाई व त्र्यंबोलीदेवी यांचा भेट सोहळा, अष्टमीला नगरप्रदक्षिणा, नवमीला खंडेपूजन आणि विजयादशमीला रथारूढ पूजेसह विविध धार्मिक परंपरा जतन केल्या जाणार आहेत. यावर्षी नवरात्रौत्सव दहा दिवसांचा असणार आहे.

दर्शन रांगांची व्यवस्था सुलभ करण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. परिसरात 120 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा उभारली असून, गर्दीचे थेट निरीक्षण करण्यात येईल. दर्शन मार्गावर मंडप उभारले आहेत. रस्त्यालगत प्रासादिक वस्तू व देवीच्या साड्यांची दुकाने मांडण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण करवीरनगरी उत्सवासाठी सज्ज झाली आहे.

नित्य पूजा विधी आणि कार्यक्रम

नित्य पूजा : दररोज सकाळी नित्य पूजाभिषेक

सालंकृत पूजा : नऊ दिवस रोज देवीची विविध रूपांत पूजा

पालखी सोहळा : पारंपरिक लवाजम्यासह रात्री सुवर्ण पालखी

विशेष कार्यक्रम

पंचमी (दि. 27 सप्टेंबर ) : ललिता पंचमीदिवशी अंबाबाई आणि त्र्यंबोलीदेवी यांच्या भेटीचा सोहळा व कोहळा फोडण्याचा विधी

अष्टमी (दि. 30 सप्टेंबर) : देवीची लवाजम्यासह सिंह वाहनावरून पालखी नगरप्रदक्षिणा

नवमी (दि. 1 ऑक्टोबर) : घटस्थापना उत्थापन, खंडेनवमी शस्त्रपूजा हा विशेष विधी

दसरा (दि. 2 ऑक्टोबर) : विजयादशमीनिमित्त देवीची रथारूढ पूजा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT