शारदीय नवरात्रौत्सव 
कोल्हापूर

चैतन्यदायी नवरात्रौत्सव सोहळ्यास आजपासून प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील सर्व मंदिरे व घरोघरी गुरुवारी घटस्थापना विधीने शारदीय नवरात्रौत्सवाच्या चैतन्यदायी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यावर्षी आश्विन शुद्ध तृतीया या तिथीत वृद्धी झाल्याने उत्सव दहा दिवस साजरा केला जाणार आहे. नवरात्र उत्सवासाठी कोल्हापूर शहर भक्तिमय झाले असून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, घरोघरी नवरात्रौत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली. सुगड, पत्रावळी, नाडापुडी, माती, बियाणे यासह पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी पूर्वसंध्येपर्यंत बाजारपेठेत गर्दी होती.

गुरुवारी सकाळी आठ वाजता देवीचे पारंपरिक श्रीपूजक मुनिश्वर कुटुंबीयांच्या वतीने अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात घटस्थापनेचा विधी करण्यात येणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर जाधव घराण्याच्या वतीने तोफेची सलामी देण्यात येईल. मंत्रोच्चारांमध्ये घटस्थापनेची महापूजा झाल्यानंतर मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. नवरात्रकाळात दररोज तीनवेळा अभिषेक आणि पाच वेळा आरती करण्यात येते. सालाबादप्रमाणे उत्सवकाळात अंबाबाईची रोज विविध रूपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे. रोज रात्री अंबाबाईचा पालखी सोहळा शाही लवाजम्यात साजरा केला जाणार आहे.

नवरात्रौत्सव काळात अंबाबाई व त्र्यंबोलीदेवी भेटीचा सोहळा व कोहळा फोडण्याचा विधी ललिता पंचमी दिवशी केला जाणार आहे; तर अष्टमीला देवीच्या पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. नवमीला खंडेपूजन व विजयादशमी म्हणजेच दसर्‍या दिवशी रथारूढ रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवासाठी अंबाबाई मंदिराची आकर्षक सजावट केली असून, दहा दिवसांत लाखो भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून जाणार आहे.

घटस्थापनेचा मुहूर्त

शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात होणार्‍या घटस्थापनेसाठी गुरुवारी पहाटे ब—ाह्ममुहूर्तापासून दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे. या काळात घटस्थापना करण्यासाठी योग्य काळ आहे. नवरात्रकाळात ललिता पंचमी, महालक्ष्मीची घागर फुंकणे, अष्टमीचा जागर, नवमीचे खंडेपूजन व दसरा हे महत्त्वाचे दिवस आहेत. यादिवशी कुलदेवतेचे पारंपरिक विधी प्रथेनुसार करावेत, असे अंबाबाई मंदिरातील पुरोहित योगेश गुरुजी यांनी सांगितले.

यंदा नवरात्रौत्सव दहा दिवस का?

आश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापनेने नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. नऊ दिवसांचा नवरात्रौत्सव असतो. यंदा मात्र दहा दिवस नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षी आश्विन शुद्ध तृतीया ही तिथी तृतीया आणि चतुर्थी या दिवशी आली आहे. तृतीया या तिथीची वृद्धी झाल्याने दहा दिवस नवरात्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT