कोल्हापूर : नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव. मात्र यावर्षी नऊ नव्हे तर दहा दिवसांचे नवरात्र व अकराव्या दिवशी विजयादशमी असा उत्सव साजरा होणार आहे. यंदा नवरात्रकाळात तृतीया या तिथीची वृद्धी झाल्यामुळे दहा दिवस नवरात्रातील विधी केले जाणार आहेत. अश्विन शुक्लपक्षातील प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस धार्मिक महत्वांनुसार साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरासह विविध मंदिरांमध्ये नवरात्रौत्सव होणार आहे. यापूर्वी 2022 या वर्षीही असा योग आला होता.
22 सप्टेंबरला प्रतिपदेदिवशी घटस्थापनेने सुरू होणार्या नवरात्रकाळात पंचमी, अष्टमी, नवमी आणि दसरा हे महत्त्वाचे दिवस आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तसेच घरोघरी नवरात्रात घटस्थापना, रोजची माळ, अष्टमीचा जागर, नवमीचे खंडेपूजन व दसर्याचे विधी केले जातात. यावर्षी 24 व 25 सप्टेंबर रोजी तृतीया तिथी आली आहे. यापैकी तृतीयेची माळ 24 रोजी घालण्यात येणार असून 25 रोजी माळ नाही.
कोल्हापुरातील नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला मोठे महत्त्व आहे. या दिवशी अंबाबाई त्र्यंबोलीच्या भेटीला जाते. त्र्यंबोली मंदिरात कोहळा फोडण्याचा विधी व यात्रा भरते. यंदा तृतीयेच्या वृद्धीमुळे ललिता पंचमीची तिथी 26 रोजी आहे. यादिवशीच्या चतुर्थीला पंचमीची तिथी येऊन मिळते. पंचमी व त्र्यंबोली यात्रा यांचा शास्त्रार्थ वेगळा असल्याने त्र्यंबोली यात्रा शनिवारी (दि.27) होणार आहे.