कोल्हापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्ये रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ पासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुकादेवी या चारही मंदिरांमध्ये पुढील दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापना, देवीच्या अलंकार महापूजा, छबिना मिरवणुका, दुर्गासप्तशती पाठ, यज्ञ-हवन आणि भक्तिसंगीत अशा कार्यक्रमांमुळे शक्तिपीठांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज (दि. ११) दुपारी १२ वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. ११ ऑक्टोबरला पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी घटस्थापना आणि रात्री छबिना. १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान नित्योपचार पूजा, छबिना सोहळा. १५ ऑक्टोबरला ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा. १६ रोजी मुरली अलंकार महापूजा. १७ ऑक्टोबरला शेषशाही अलंकार महापूजा. १८ ऑक्टोबर भवानी तलवार अलंकार महापूजा. १९ रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, २० ऑक्टोबरला घटोत्थापन, धार्मिक विधी आणि पलंग-पालखी मिरवणूक.
श्री सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिर, वणी
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी (दि. ११) सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा, ९.३० वाजता घटस्थापना. त्यानंतर नवरात्रौत्सवात दररोज सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा दैनंदिन स्वरूपात होईल. प्रमुख धार्मिक सोहळा सोमवारी (दि. १९) होईल. दुपारी २ वाजता श्री भगवती पालखीपूजन व नगरप्रदक्षिणा, तर दुपारी ३.३० वाजता श्री भगवती कीर्ती ध्वजपूजा व मिरवणूक निघेल. श्री सप्तशृंग देवीची अश्विन नवरात्र यात्रा रविवार (दि. ११) ते मंगळवार (दि. २०) या कालावधीत होईल. २५ ते २६ ऑक्टोबरदरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे.
श्री रेणुकादेवी मंदिर, माहूरगड
नवरात्रौत्सवात ११ ऑक्टोबर रोजी वैदिक महापूजा, गणेशपूजन, वेदघोष, घटस्थापना, दुर्गासप्तशती पाठ, छबिना, महाआरती आणि महाप्रसाद. १२ ते १७ ऑक्टोबरदरम्यान वैदिक महापूजा, कुमारिका पूजन, फुलोरा महाप्रसाद आणि ललितापंचमीचे जागरण. १८ ऑक्टोबरला शतचंडी महायज्ञ. १९ ऑक्टोबरला यज्ञाची पूर्णाहुती, महानैवेद्य आणि महाआरती. २० ऑक्टोबरला शस्त्रपूजन, भगवान परशुराम पालखी, सीमोल्लंघन, महाआरती. या काळात जागर आदिशक्तीचा, भक्तिसंगीत, कीर्तन, भजन, गोंधळ, भारूड, कविसंमेलन, अभंगवाणी व शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रमही नियोजित आहेत.
यावर्षी दोन दिवस सप्तमी तिथीमुळे नवरात्र दहा दिवसांची
आश्विन शुक्ल सप्तमी तिथी लगतच्या दोन दिवस सूर्योदयाला आल्याने १७ आणि १८ ऑक्टोबर अशी सप्तमी तिथीची वृद्धी झाल्याने यंदा दहा दिवसांची नवरात्र आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी अपराण्हकाली व प्रदोषकाली दशमी असल्याने त्याच दिवशी नवरात्रौत्थापन, विजयादशमी दसरा असल्याची माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. यंदा सप्तमी तिथी वृद्धी झाल्याने नवरात्र १० दिवसांचे असेल. १५ ऑक्टोबरला ललिता पंचमी, १७ ऑक्टोबर रोजी सरस्वती पूजन आहे. १८ ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी पूजन करावयाचे आहे. १९ ऑक्टोबर रोजी महाष्टमी उपवास आणि महानवमी उपवास असून १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०-२७ ते ११-१५ या कालावधीत संधिकाल पूजन करता येईल.