मुंबई : ‘गोकुळ’सारख्या सहकारी संस्थेच्या उद्योग विस्तारासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वाशी या परिसरात विस्तारित दुग्ध शाळेसाठी पंधरा एकरपर्यंत औद्योगिक भूखंड तसेच पुणे येथे पॅकिंग स्टेशनसाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकार्यांची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नविद मुश्रीफ यांनी संचालकांसह फडणवीस यांची मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांचा श्री अंबाबाईची प्रतिमा, पुष्पगुच्छ व ‘गोकुळ’ची उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, जनसुराज्य युवाशक्ती प्रदेशध्यक्ष समित कदम, संचालक विश्वास पाटील, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिशसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नविद मुश्रीफ यांनी संचालकांसमवेत ‘सह्याद्री’वर भेट घेतली. यावेळी शिंदे यांचा मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या भेटीवेळी अरुण डोंगळे अनुपस्थित होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता पूर्वनियोजनानुसार बाहेरगावी जाणार असल्याची कल्पना दिली होती, असे ते म्हणाले.