कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचा गोकुळ ठरावधारकांचा मेळावा कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची उपस्थिती होती.
जनसुराज्यचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात अमर पाटील यांनी स्वागत केले. आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, करणसिंह गायकवाड, केडीसीसीचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर यांची मनोगते झाली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, गेली पाच वर्षे अतिशय चांगला कारभार झालेला आहे. ना. हसन मुश्रीफ यांनी सर्वच नेतेमंडळी व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम केलेले आहे.
नवीद मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जनसुराज्यचे नेते व आमदार डाॅ. विनय कोरे यांचे निमंत्रण आल्यामुळे मी त्या मेळाव्याला गेलो होतो. जनसुराज्य हा महायुतीमधील एक महत्त्वाचा पक्ष आहे. आम्ही सर्वजण महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
‘गोकुळ’ बिनविरोधची चर्चा आताच नाही; निवडणुकीच्या वळणावर निर्णय : आ. विनय कोरे
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सध्या लवकर होणार नसल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी स्पष्ट केले. ‘निवडणुकीला दररोज वेगवेगळे वळण लागत आहे. त्यामुळे बिनविरोधचा निर्णय घेण्यासाठी अद्याप वेळ आहे,’ असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना कोरे म्हणाले, ‘कोणत्याही सहकारी संस्थेचा कारभार संस्थेच्या हिताच्या दृष्टीने झाला पाहिजे. एखाद्या निवडणुकीत घोडेबाजार मर्यादेपलीकडे जात असेल, तर नेतृत्व करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक निर्णय घेणे सहकाराच्या हिताचे ठरू शकते.’ ‘गोकुळ’च्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘सध्या रोज नवीन घडामोडी घडत आहेत. कोणी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेत आहे, तर कोणी महाविकासकडून महायुतीसोबत येत आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. बिनविरोधचा निर्णय इतक्या लवकर होईल, असे वाटत नाही.’