लॉकरवाढीसाठी जागेचा प्रश्न उद्भवला आहे  file photo
कोल्हापूर

Navaratri 2024 | कोल्हापूर- भाविक लाखांवर अन् अवघे २२९ बॅग लॉकर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिरात पर्यटक भाविकांची संख्या दररोज किमान एक लाखापर्यंत असते. परगावाहून येणाऱ्या भाविकांना प्रवासी बॅगेसह मंदिरात प्रवेश नसल्याने बॅग लॉकरचा आधार घ्यावा लागतो; मात्र सध्या भाविक लाखावर आणि बॅग लॉकर अवघे २२९ असे चित्र आहे. नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची यंदाही अपुऱ्या बॅग लॉकरमुळे गैरसोय होणार असून, बॅग लॉकरची संख्या वाढवण्यात जागेची उपलब्धता नसल्याचा प्रश्न देवस्थान समितीसमोर आहे; मात्र या असुविधेचा फटका भाविकांना सहन करावा लागत आहे.

नवरात्रौत्सवाला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या नऊ दिवसांत जवळपास २५ लाख भाविकांची गर्दी होते. यापैकी ८० टक्के भाविक हे परगावाहून येतात. त्यांच्या प्रवासी बॅगा ठेवण्यासाठी लॉकर सुविधा आहे. सध्या हे लॉकर भवानी मंडपातील पागा बिल्डिंग येथे आहेत. भाविकांची एकाच वेळी गर्दी झाल्यानंतर तुलनेने हे लॉकर अपुरे पडतात. त्यामुळे भाविकांच्या कुटुंबातील एकाला बॅगजवळ थांबावे लागते.

अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराच्या प्रवेशद्वारावर पर्स व छोट्या बॅग स्कॅनरची यंत्रणा आहे, तर मोठ्या आकाराच्या प्रवासी बॅग भाविकांना बॅग लॉकरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे; मात्र नवरात्रौत्सवात बॅग लॉकर यंत्रणा तोकडी पडत असल्याने बॅग लॉकरसाठी भाविकांना प्रतीक्षा करावी लागते. यामुळे भाविकांना दर्शनासाठी वेळ लागतो. यापूर्वी विद्यापीठ हायस्कूलसमोरील जागेत बॅग लॉकर सुविधा होती; मात्र ती जागा कमी पडल्याने बॅग लॉकर सुविधा पागा इमारतीत सुरू करण्यात आली. या ठिकाणीही जागेअभावी बॅग लॉकरची संख्या वाढवण्यात देवस्थान समितीला अडचणी येत आहेत.

बॅग सुविधा 66 पागा इमारतीत वेग लॉकर सु पागा ही सुविधा अपुरी पडते. सध्या जागेची उपलब्धता करून भाविकांना योग्य त्या सुविधा देण्याचा देवस्थान व्यवस्थापनाचा प्रश्न आहे.
महादेव दिडे, व्यवस्थापक, देवस्थान समिती

लॉकरसंदर्भात प्रवेशद्वारांबाहेर फलक असणे आवश्यक

अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी परगावाहून जे भाविक सार्वजनिक वाहनाने येतात, त्या भाविकांना बॅग लॉकरची सुविधा आवश्यक असते. मात्र मंदिराकडे येणाऱ्या प्रवेशद्वारांवर बॅग लॉकर कुठे आहेत, हे दाखवणारे ठळक फलक नसल्याने अनेकदा भाविकांचा बॅग लॉकरची चौकशी करण्यात वेळ जातो. बॅग लॉकरसंदर्भात मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांबाहेर फलक असणे आवश्यक आहे, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT