kolhapur | जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी, भाजपमध्ये रस्सीखेच Pudhari
कोल्हापूर

kolhapur | जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी, भाजपमध्ये रस्सीखेच

अध्यक्षपदाचा दावेदार राष्ट्रवादीच : अध्यक्षपद हिसकावण्याचा भाजपचा प्रयत्न?

अरुण पाटील

विकास कांबळे

कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला असला, तरी आता खरी लढाई सत्तास्थापनेनंतरच्या पदवाटपावर येऊन ठेपली आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात दावे, प्रतिदावे सुरू असल्याने महायुतीतील वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात येत आहे.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ दावेदार असली, तरी भाजपने मात्र अध्यक्षपदासाठी हबकी डाव खेळण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जाते. स्थानिक पातळीवर या वादावर तोडगा न निघाल्यास वरिष्ठ नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे नेत्यांनादेखील उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जमेल तिथं एकत्र, अन्यथा मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय महायुतीतील प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका बहुतांशी ठिकाणी स्वतंत्रच लढल्या गेल्या. या निवडणुकीत सर्वाधिक 20 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी तेच दावेदार आहेत.

महापालिकेत ज्याचे जादा नगरसेवक त्याचा महापौर असे सूत्र राबविण्याचा निर्णय भाजपनेच घेतला. त्याला सर्वांनी मान्यता दिली. जिल्हा परिषदेमध्येदेखील हेच सूत्र राबविण्याची चर्चा झाली असताना भाजपने आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या सदस्यांचा आधार घेत अध्यक्षपदावर दावा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महायुतीमधील वातावरण तापू लागले आहे.

राष्ट्रवादीकडून इच्छुक

शैलजा पाटील (अनुभवी, पती माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे पाठबळ), शिल्पा खोत (दुसर्‍यांदा निवडून, स्थानिक प्रभाव), विद्या पाटील, शोभाताई फराकटे, मानसी भोगण (उच्चशिक्षित), अमृता डोंगळे (उच्चशिक्षित, गोकुळ पार्श्वभूमी), याशिवाय पूजा पाटील, रेखा मुगडे यांच्या नावांची चर्चा

भाजपकडून यांची नावे चर्चेत

सानिका आवाडे, सुयशा घाटगे, विनीता भोगम, शिवाणी भासेले.

अध्यक्षपद ः आकडे अन् खेळ...

राष्ट्रवादीचे सर्वाधिक 20 सदस्य; नैसर्गिक दावा

‘ज्याचे जास्त सदस्य, त्याचा महापौर’ हेच सूत्र जि.प. अध्यक्षपदासाठी राबविणार काय?

भाजपकडून आघाडीच्या सदस्यांच्या आधारावर दावा

तोडगा न निघाल्यास निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे जाण्याची शक्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT