कोल्हापूर ः देशातील हळद उत्पादक शेतकर्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हळदीचे उत्पन्न आणि निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली आहे. या संस्थेच्या वतीने हळदीच्या उत्पादनाला प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी याची घोषणा केली आहे. भाजप नेते आणि हळद उत्पादक शेतकरी पाले गंगा रेड्डी यांची या मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली असून, तेलंगणातील निजामाबादमध्ये या मंडळाचे मुख्यालय निश्चित केले आहे. यामध्ये आयुष, कृषी व शेतकरी कल्याण, खते व रसायने मंत्रालयांच्या प्रतिनिधींसोबत हळद उत्पादक शेतकरी, हळद निर्यातदार आणि तेलंगणा महाराष्ट्रातील काही प्रमुख व्यक्तींचा समावेश केला आहे.
सध्या देशातून 226 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेची हळद निर्यात होते. जागतिक बाजारात हळदीला असलेली मागणी लक्षात घेता हळदीच्या निर्यातीला मोठा वाव आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. या नव्या मंडळाच्या वतीने हळदीची उत्पादकता वाढविणे, नवे वाण विकसित करण्यासाठी संशोधन करणे, यासाठी आंध्र, तेलंगणा या दोन हळद उत्पादक प्रमुख राज्यांसोबत हळदीच्या उत्पादनाला हातभार लावणार्या महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मेघालय यांसारख्या 20 राज्यांतील शेतकर्यांना या मंडळाच्या वतीने सहकार्य केले जाणार आहे.
स्थानिक हळद उत्पादनासोबत शेजारील भागातूनही हळदीची आवक सांगलीच्या बाजारपेठेत होते. या शेतकर्यांसाठी हे नवे मंडळ लाभदायक ठरू शकते. जगाच्या कानाकोपर्यात सांगलीची प्रसिद्ध हळद पोहोचू शकते. यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष पुढाकार घेणे गरजेचे आहे.