कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रगीत अवमानप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 6 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचे स्पष्ट केले होते. त्याविरुद्ध तक्रारदार मेजर संजय शिंदे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागितली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्यासमोर बुधवारी सुनावणी होऊन कनिष्ठ न्यायालयाचा 6 डिसेंबरचा निकाल तूर्तास स्थगित केल्यासारखा प्रभावी आदेश दिला. पुढील सुनावणी 8 डिसेंबरला होणार आहे. शिंदे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सुमारे 20 वर्षांपूर्वी महापालिकेत राष्ट्रगीत अवमान प्रकरण घडले होते. त्याविरुद्ध शिंदे यांनी न्यायालयात तत्कालीन 56 नगरसेवकांविरुद्ध याचिका दाखल केली आहे. गेली 20 वर्षे त्यावर सुनावणी सुरू आहे. 1 डिसेंबर रोजी कोल्हापूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. फिर्यादी पक्षातील महत्त्वाचे अर्ज, पुरावे, साक्षीदारांची मागणीसह सर्वच अर्ज फेटाळण्यात आले. त्याविरुद्ध शिंदे यांच्या वतीने अॅड. रणजितसिंह घाटगे, अॅड. तेजस्वी घाटगे यांनी सर्किट बेंचमध्ये बाजू मांडली. वीस वर्षांचे प्रकरण आहे. चार्ज ठरायला 7 वर्षे 4 महिने लागले. फिर्यादीचा पुरावा अजून मांडायचा आहे. साक्षीदारांची प्रतिपूर्तता नाकारून थेट निकालाकडे जाणे हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य आहे, असे अॅड. घाटगे यांनी सांगितले.