जयसिंगपूर : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दाखल करणार्या याचिकेचा कच्चा मसुदा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी याबाबतचा पक्का मसुदा तयार झाल्यानंतर पुढील आठवड्यात याचिका न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात काम पाहणार्या अॅड. असीम सरोदे यांनी गुरुवारी नांदणी येथील मठास भेट दिली. यावेळी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
अॅड. सरोदे म्हणाले, कोल्हापूरच्या लोकांनी न्यायालय देखील महत्वाचं असतं, हे दाखवून दिले. महादेवी हत्तिणीसाठी झालेला संघर्ष आणि ती परत येण्यासाठी झालेला विजय महत्त्वाचा आहे. सर्वधर्मीय लोक पाठीशी उभे राहिले. राज्य सरकारलाही दखल घ्यावी लागली. महादेवीला परत घेताना कायदेशीर बाबी तपासाव्या लागणार आहेत. कोणत्या पद्धतीने हत्ती देणे वनताराला शक्य आहे हे पाहावे लागणार आहे. करारामधील प्रत्येक तपशील वाचून घ्यावा लागेल. महादेवी हत्तीण परत देताना काही सोयी-सुविधा नांदणीत असल्या पाहिजेत. त्याच्या खर्चाची तरतूद कोण करणार, त्या तरतुदी कशा असल्या पाहिजेत, तिचे जीवन अधिक चांगले व्हावे याबद्दलच्या अटी, शर्ती, नियम काय असतील याबाबतचे अधिकार याची काळजी घ्यावी लागेल. वनतारातर्फे हत्तीण पतर देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. या सर्व बाबींचा विचार न्यायालय करेल, असेही त्यांनी सांगितले.