जयसिंगपूर : नांदणी येथील 1,200 वर्षे जुन्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची ‘महादेवी’ हत्तीण आणि तिच्या भवितव्याचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. प्राणी हक्कांना प्राधान्य देत मुंबई उच्च न्यायालयाने ‘महादेवी’ हत्तीणीला दोन आठवड्यांत गुजरात येथील हत्ती कल्याण केंद्रात स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला आव्हान देत, मठाच्या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी संस्थान मठाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाचा हक्क आणि धार्मिक विधींसाठी हत्तीच्या वापराचा हक्क या संघर्षात, प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. या निरीक्षणासह न्यायालयाने ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष केंद्रात पाठवण्यास परवानगी दिली.
या प्रकरणाची सुरुवात ‘पेटा’ या प्राणी हक्कांसाठी लढणार्या संस्थेच्या आरोपांनंतर झाली. त्यांनी मठावर वन विभागाची परवानगी न घेता ‘महादेवी’ हत्तीणीला तेलंगणातील एका मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती नेमली होती. या समितीने जून आणि नोव्हेंबर 2023 मध्ये हत्तीणीची तपासणी करून अहवाल सादर केला होता, ज्याच्या आधारे न्यायालयाने हा निर्णय दिला.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून ‘महादेवी’ हत्तीणीला मठातून घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू होते. वन्य जीव (संरक्षण) कायदा, 1972 लागू झाल्यापासून मठाने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून हत्तीणीचे संगोपन केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाचा निर्णय मठाच्या विरोधात गेला.
आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार, याकडे केवळ नांदणी परिसराचेच नव्हे, तर देशभरातील धार्मिक संस्था आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या निकालामुळे भविष्यात अशा प्रकरणांसाठी एक नवा कायदेशीर मापदंड स्थापित होण्याची शक्यता आहे.
* नांदणी येथील जैन मठ हा महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील 748 गावांतील जैनधर्मीयांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान आहे.
* या मठाला सुमारे 1,200 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे.
* अनेक दशकांपासून मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे.
* मठाच्या अखत्यारीतील गावांमध्ये होणार्या ‘पंचकल्याणक प्रतिष्ठा’ महोत्सवात या हत्तीणीला विशेष मान असतो.
* पूजेतील इंद्र-इंद्राणींना हत्तीवरून मिरवणुकीने भगवंतांच्या अभिषेक स्थळी नेले जाते, जो परंपरेचा एक अविभाज्य भाग मानला जातो.