सागर यादव
कोल्हापूर : नानांचं कोल्हापूरवर आणि कोल्हापूरकरांवर जीवापाड प्रेम होते. कोल्हापूरची माती, इथली माणसं आणि इथला रांगडा स्वभाव त्यांना मनापासून आवडायचा. ते नेहमी म्हणायचे, ‘मला कोल्हापुरात जागा हवी आहे रे...’ त्यांच्यासाठी दोन-चार जागाही पाहिल्या होत्या; पण त्यांना त्या पसंत पडल्या नाहीत. यामुळे कोल्हापूरचा रहिवासी व्हायची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.
कोल्हापूरकरांशी जोडलेला अभिनेता नाना पाटेकर यांची नाळ अखेरपर्यंत घट्ट राहिली. नानांना नेमबाजी (शूटिंग) खेळाची विशेष आवड असल्याने ते पुणे, केरळ, दिल्ली अशा स्पर्धांसाठी जायचे. तेथे त्यांची भेट कोल्हापूरचे रहिवासी आणि भारतीय शूटिंग संघाचे व्यवस्थापक बंडा साळोखे यांच्याशी झाली. तेथून गेल्या पंचवीस वर्षांत नानांची कोल्हापूर भेट ठरल्यासारखी होती. मित्र प्रसाद कामत यांच्यासोबत ते कोल्हापूर फिरायचे. बंडा साळोखे यांना बंड्या तर प्रमोद पाटील यांना जाड्या म्हणून हाक मारायचे. कोल्हापूरचे मित्रमंडळ नानांच्या घरी गणपतीसाठी जायचे. तेथे त्यांच्या आई, पत्नी व मुलगा मल्हार यांच्याशी ऋणानुबंध निर्माण झाले होते. कोल्हापुरात आल्यावर कोल्हापुरी मटण, वजडी, डांगर-भाकरी, मिसळ अशा मराठमोळ्या पदार्थांवर ते आवर्जून ताव मारायचे. विशेष म्हणजे आपल्या आईच्या वाढदिनी (१ जानेवारी) ते स्वत: कोल्हापुरी पदार्थ बनवायचे.
नानांना खेळ आणि खेळाडूंबद्दल विशेष आपुलकी
नानांना खेळ आणि खेळाडूंबद्दल विशेष आदर होता. खेळाडूंनी जिद्दीने पुढे यावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. कोल्हापूरच्या हिल रायडर्स व समिट अॅडव्हेंचर्सच्या हिमालयातील देव तिब्बा मोहिमेला त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मोहीम फत्ते झाल्यानंतर हिमालयातील हवामान अचानक बिघडल्याची माहिती कळताच काळजीने नानांनी गिर्यारोहकांना फोन करून त्यांची विचारपूस केल्याची माहिती ज्येष्ठ गिर्यारोहक प्रमोद पाटील यांनी दिली.
दुधाळी शूटिंग रेंजमध्ये इलेक्ट्रॉनिक पुली बसवल्या
२००५ मध्ये कोल्हापुरातील मनपाच्या दुधाळी मैदानावरील छत्रपती संभाजी महाराज नेमबाजी प्रशिक्षण केंद्रावर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा झाली होती. त्यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या नाना पाटेकर यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश कुसाळे यांनी विशेष मार्गदर्शन केले होते. शूटिंग रेंजवर सराव करताना टार्गेट सेट करण्यासाठी खेळाडूंना हाताने फिरवायच्या पुली वापरायला लागायची. यात त्यांचा वेळ व श्रम वाया जाऊन एकाग्रता भंग होत होती. ही बाब लक्षात घेऊन नाना पाटेकर यांनी तातडीने इलेक्ट्रॉनिक पुली तयार करणाऱ्या कारागिरीला बोलवून १५ पुलींसाठी १ लाख ५ हजार रुपये दिल्याची माहिती प्रशिक्षक रमेश कुसाळे यांनी दिली.
बेळगावात बनले ‘कमांडो’
बेळगाव : नाना पाटेकर यांनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या ‘प्रहार’ चित्रपटातील मेजरची भूमिका साकारण्यासाठी बेळगावातील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर व इन्फंट्री स्कूलमध्ये तब्बल साठ दिवसांचे कमांडो प्रशिक्षण घेतले. पहाटे उठून घाम गाळणारी शारीरिक कसरत, अडथळ्यांची शर्यत आणि लष्कराची कडक दिनचर्या त्यांनी पाळली.