सुनील कदम
कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कोल्हापूर ते रत्नागिरी या शेवटच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. पण, हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, कोकणात तर या महामार्गाच्या नुसत्या ‘चिंधड्या’ झाल्या आहेत. हजारो खड्ड्यांमुळे या रस्त्यावरचा प्रवास धोकादायक बनलेला आहे.
मागील जवळपास दोन वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे; पण अजून 25-30 टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. अत्यंत धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे आणि अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग काढले गेल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वास्तविक पाहता कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रवास दोन ते अडीच तासांचा; पण आज हेच अंतर पार करण्यासाठी पाच ते सहा तास लागत आहेत, अवजड वाहनांना तर त्यापेक्षा जास्त वेळ लागत आहे.
हा महामार्ग करताना अनेक ठिकाणी पर्यायी किंवा तात्पुरते सेवारस्ते करण्यात आलेले आहेत. पण, या सेवारस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचे झाल्यामुळे या सेवारस्त्यांवर सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य माजले आहे. हे खड्ड्यांचे प्रमाण इतके आहे की, रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्या-खड्ड्यांतून रस्ता चाललाय, हेच समजून येत नाही. या महामार्गावर ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या भुयारी मोर्यांची कामे केल्यानंतर तो भाग अजूनही मुख्य रस्त्याशी पक्क्या रस्त्याने जोडला गेला नाही. त्यामुळे या मोर्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य माजले आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना वाहनांची इतकी आदळ-आपट होते की, वाहनांचे किमान एक-दोन पार्ट निकामी झाल्याशिवाय राहात नाहीत. वाहनातील लोकांची अवस्था तर सुपात घेऊन पाखडल्यासारखी होते. दुचाकी वाहनधारकांची अवस्था तर विचारायलाच नको.
महामार्गाचे काम करताना हजारो ठिकाणी खोदकाम केले आहे. यातील मातीचे व मुरुमाचे ढिगारे महिनोन् महिने जागेवर पडून आहेत. त्यातून कसरत करीतच वाहनधारकांना मार्ग काढावा लागतो. तशातच आता पावसामुळे या ढिगार्यांमधील माती वाहून रस्त्यावर येत असल्याने अनेक ठिकाणी रस्ता निसरडा बनला आहे. अशा निसरड्या रस्त्यावरून वाहनांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. एकूणच आजकाल कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरचा प्रवास सुखाचा राहिलेला नाही.
मुंबई-गोवा महामार्गाची गेल्या कित्येक वर्षांपासून वाताहत झालेली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या किंवा अन्य वेळी गावी जाण्यासाठी कोकणवासीय लोक कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचा वापर करीत होते. पण, सध्या या महामार्गाची अवस्था तर मुंबई-गोवा महामार्गापेक्षा बिकट झालेली आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही मार्गाने गेले तरी कोकणच्या लोकांना गावी जाताना धक्के खातच जावे लागणार आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था आहे त्याहून बिकट होण्याची लक्षणे दिसत आहेत.
या महामार्गाचे काम करीत असताना पूर्वीच्या रस्त्यावर असलेली धोकादायक वळणे काढणे किंवा कमी करणे अपेक्षित होते. मात्र, नव्याने तयार होत असलेल्या महामार्गावरही नव्याने काही धोकादायक वळणे तयार होताना दिसत आहेत. हा महामार्ग जरी पूर्ण झाला तरी त्यावरही धोकादायक वळणे असणारच आहेत. त्यामुळे सध्या हा महामार्ग बांधकामाधीन असतानाच आतापासूनच धोकादायक वळणे निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, महामार्ग झाला तरी हा महामार्ग धोकादायकच गणला जाईल.