Shaktipeeth highway  
कोल्हापूर

Shaktipeeth highway | 1130 गट नंबर अन् शेकडो कुटुंबे धोक्यात!

शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देणारा महामार्ग नको; राधानगरीतील 14 गावांचा एल्गार

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण ढोणे

राशिवडे : सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नावाखाली राधानगरी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा समोर येताच, राधानगरीच्या पूर्व भागातील 14 गावांतील तब्बल 1130 गट नंबर बाधित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिढ्यान्पिढ्या कसत असलेली सुपीक काळी जमीन उद्ध्वस्त होणार असल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी आता देशोधडीला लागण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. सरकारच्या या तडाख्या विरोधात आता राधानगरीच्या मातीत संघर्षाची ठिणगी पडली आहे.

9 मे रोजी सरकारने या महामार्गाची अधिसूचना काढली खरी; पण ती काढताना स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेण्याचे सौजन्यही दाखवले नाही. तालुक्याचा पश्चिम भाग आधीच अभयारण्याच्या नावाखाली कोंडवाड्यात आहे, तिथे विकास खुंटला आहे. आता पूर्व भागातील भोगावती आणि दूधगंगा नद्यांच्या काठावरील सोने पिकवणारी जमीन महामार्गाच्या सिमेंटखाली गाडली जाणार आहे. ‘हा आमचा विकास आहे की तुमचा विनाश?’ असा जळजळीत सवाल आता इथला शेतकरी विचारत आहे. महामार्गाच्या कचाट्यात सापडलेल्या गावांमधील गट नंबरची आकडेवारी धडकी भरवणारी आहे.

यामध्ये मालवे गावातील सर्वाधिक 300 गट नंबर, कौलव 168, तुरंबे 133, तर कपिलेश्वरमधील 31 गट नंबर बाधित होणार आहेत. यासह मोहडे, कोदवडे, राशिवडे बुद्रुक, वाघवडे, ठिकपुर्ली, कुंभारवाडी, माजगाव, पिंपळवाडी आणि चाफोडी या गावांतील शेतजमिनींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तलाठ्यांमार्फत आता या बाधित क्षेत्रांची प्रसिद्धी केली जाणार असली, तरी शेतकर्‍यांनी मात्र आपला विरोध नोंदवण्यासाठी आतापासूनच दंड थोपटले आहेत.

दुहेरी कात्रीत बळीराजा

हा महामार्ग केवळ जमीनच हिरावणार नाही, तर पर्यावरणाचा समतोलही बिघडवणार आहे. भोगावती आणि दूधगंगा नद्यांवर बांधले जाणारे अवाढव्य पूल आणि रस्ते यामुळे भविष्यात या भागात कृत्रिम महापूर येण्याची भीती व्यक्त होत आहे. एका बाजूला अभयारण्यातील जंगली जनावरांचा हैदोस आणि दुसर्‍या बाजूला शासकीय प्रकल्पाचा हा वरवंटा; अशा दुहेरी कात्रीत राधानगरीचा बळीराजा अडकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT