हातकणंगले : हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर मतमोजणी प्रक्रियेपर्यंत अनेक कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातूनच प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार रणजित धनगर व सागर पुजारी या कार्यकर्त्यांमध्ये पाच लाखांची पैज लागली आहे. ही पैज पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आल्याने हातकणंगले परिसराबरोबरच पंचक्रोशीत या पैजेची जोरदार चर्चा सुरू आहे.
हातकणंगले नगरपंचायतीचा निकाल लांबणीवर पडला आहे. आपल्या उमेदवारांसाठी राबलेले कार्यकर्ते आमचा उमेदवार निवडून येणार, हे ठामपणे सांगू लागले. त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांका दहामध्ये अशीच एक पैज लावण्यात आली आहे. ही पैज पाच लाख रुपयांची असल्याने दोन्ही कार्यकर्त्यांनी ही रक्कम एका त्रयस्त व्यक्तीकडे दिली असून त्या पैजेच्या अटी व शर्ती एका स्टॅम्प पेपरवर लिहिल्याने या पैजेची पंचक्रोशीत जोरदार चर्चा झाली सुरू झाली आहे. याचबरोबर या पैजेचा स्टॅम्प व ठरलेली रक्कम ही त्रयस्त कार्यकर्त्याकडे दिली, तसेच सदर पैज ही सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या पैजेला आणखीच जोर चढला असून याची परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे प्रभाग क्रमांक दहा अतिसंवेदनशील झाल्याचीही चर्चा आहे.