सागर यादव
कोल्हापूर : सोशल मीडियावर चमकण्यासाठी रिलस्टार सर्पमित्रांचा सुळसुळाट असल्याचे चित्र आहे. अर्धवट व अपुऱ्या माहितीमुळे जीवघेण्या अपघाताच्या घटानाही घडू लागल्या आहेत. निसर्गातील महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या सर्पांच्या संरक्षणाची आवश्यकता पाहता सर्पमित्रांची नितांत गरज आहेच; पण त्यासाठी शिस्त आणि योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
सोशल मीडियावरील प्रसिद्धीकरिता स्टंटबाजी आणि प्रसिद्धीची हाव यामुळे युवकांकडून धोकादायक गोष्टी सातत्याने होत आहेत. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी आणि ‘लाईक्स’ मिळवण्यासाठी अर्धवट ज्ञानाच्या आधारे साप पकडण्याचे फॅड वाढले आहे. सापांना हवेत उडवणे, त्यांना किस करणे, गळ्यात घालून फिरवणे अशा गोष्टी केवळ प्रसिद्धीसाठी केल्या जात आहेत. या प्रकारांमुळे स्वतः सर्पमित्रांचा आणि सापांचाही जीव धोक्यात येत असून अनेक स्टंटबाजांवर सर्पांचा चावा, गंभीर जखमा आणि प्राण गमावण्याची वेळ आली आहे.
याबाबत वन विभागाकडून सतत प्रबोधन केले जात आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत सापांना पकडणे, त्रास देणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा स्टंटबाजी करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. सापांचे रेस्क्यू करताना केवळ स्नेक टोंग किंवा हुक यांसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे; मात्र याकडे दुर्लक्ष करून रिलसाठीची स्टंटबाजी सुरूच आहे.
सध्या गल्ली-बोळात अर्धवट ज्ञान असणारे सर्पमित्र तयार झाले आहेत. सोशल मीडियावरील प्रसिद्धी व लाईक्ससाठी सापांसोबत स्टंटबाजी केली जात आहे. या स्टंटमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वन विभागाच्या माध्यामातून योग्य प्रशिक्षण, परिपूर्ण माहिती घेऊनच साप व तत्सम प्राणी रेस्क्यू करावेत.- देवेंद्र शहाजी भोसले (मानद वन्यजीव रक्षक)