पुढारी ऑनलाईन डेस्क: 'पुढारी NEWS' च्या 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी आज (दि.१३) संवाद साधला. यावेळी त्यांनी माता सुरक्षित सेवा योजनेच्या प्रेरणेमागे माझी आई असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी या मागचा प्रसंग सांगितला.
तानाजी सावंत बोलताना पुढे म्हणाले, माझा पडद्यामागचा प्रवास प्रचंड खडतर आहे. मी ग्रामीण भागातून येतो. आम्ही तीन भावंडं, वडील वारकरी होते. त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाचा भार हा आईवर होता. एक दिवस आई शेतातून डोक्यावर बिंडा घेऊन घरी आली आणि अंथरूण टाकून झोपली. अचानक तिला थंडी वाजून ताप आला. आम्ही दोन भावंडे तिच्या जवळ गेलो तर ती तापाने भाजत होती. आम्ही दोघांनी तिला मेडिकल मधील गोळी आणून दिली. तिने ती खाल्ली आणि झोपली. थोड्या वेळाने तिचा ताप कमी आला, अशी आईबाबतची आठवण मंत्री तानाजी सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही ९० टक्के घरची माता हिच कुटुंबप्रमुख असते. संसाराचा भार संपूर्ण तिच्या डोक्यावर आहे. संसाराचा हा गाडा ओढत असताना आजही राज्यातील बहुतांशी महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लभ करतात. 'माता सुरक्षित, घर सुरक्षित अभियान' उपक्रमाची कल्पना सुचली. या योजनेमार्फत 2 वर्षात आतापर्यंत 18 वर्षावरील 4 कोटी 19 लाख महिलांना लाभ दिल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत सांगतात.