एकनाथ नाईक
कोल्हापूर : सीपीआरच्या भिंतींनाही हादरवून टाकणारा तो आक्रोश होता. ‘माझी भाग्यश्री गेली ... आता मी जगून काय करू’ असे म्हणत पती लक्ष्मण गवळी आक्रोश करत होते. अवघ्या दीड वर्षापूर्वी सुरू झालेला त्यांचा संसार शनिवारी शाहू मिल चौकात येथे झालेल्या कार आणि मोपेड अपघातात एका क्षणात उद्ध्वस्त झाला आणि प्रेमाने फुललेले घरकूल नियतीने निर्दयीपणे हिरावून नेलं.
खोकुर्ले (ता. गगनबावडा) येथील लक्ष्मण शिवाजी गवळी यांचा 5 मे 2024 रोजी भाग्यश्रीशी विवाह झाला होता. अलीकडेच वकिलीची पदवी घेऊन व्यवसाय करत ती न्यायालयीन परीक्षेची तयारी करत होती. कष्टाळू, जिद्दी आणि स्वप्नाळू भाग्यश्री कुटुंबाची आशा होती. सहा महिन्यांपूर्वी आईच्या निधनानंतर तीच वडिलांचा आधार बनली होती. चार बहिणींमध्ये सर्वाधिक लाडकी असलेली भाग्यश्री वडिलांसाठी जगण्याचं बळ होती.
लग्नानंतर कसबा बावडा येथे दोघांचा संसार सुरू होता. लक्ष्मण कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. साधं पण सुखी आयुष्य. एकमेकांवर विश्वास आणि उद्याची सुंदर स्वप्न यावर त्यांचं जगणं सुरू होतं. लक्ष्मणची आई संजीवनी, वडील शिवाजी खोकुर्ले येथे शेती करतात. मोठा भाऊ रोहित कोल्हापुरात नोकरीला असून संपूर्ण कुटुंब एकमेकांचा आधार होतं. शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मतदान करून दोघे कोल्हापुरात आले. लक्ष्मणने भाग्यश्रीला वडिलांकडे सोडले आणि कामावर गेला. दुपारी तीनच्या सुमारास त्याचा फोन खणाणला. ‘भाग्यश्रीचा अपघात झाला आहे. ताबडतोब सीपीआरला ये’ हे शब्द कानावर पडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घामाने भिजलेलं अंग, डबडबलेले डोळे अशा अवस्थेत तो सीपीआरमध्ये पोहोचला.
सीपीआरबाहेरील नातेवाईक, पाहुण्यांची गर्दी, चिंताग्रस्त चेहरे पाहून अनर्थ घडल्याचे लक्ष्मणच्या लक्षात आले. ‘मला एकदा भाग्यश्रीला पाहू द्या’ असे म्हणत तो अपघात विभागाच्या दिशेने धावत होता. मित्र त्याला सावरत होते. काही वेळातच भाग्यश्री काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजताच त्याने आक्रोश केला. भाऊ रोहितला मिठी मारून त्यांनी हंबरडा फोडला. ‘ तिच्याशिवाय माझं काय अस्तित्व? मी जगून काय करू?’ हे शब्द ऐकून उपस्थितांचं काळीज पिळवटून निघाले. मित्र त्याला धीर देत होते, तर भाऊ मायेने चेहर्यावर हात फिरवून आधार देत होता; पण त्यांच्या अश्रूंचा बांध थांबत नव्हता.
सनगर गल्ली, खोकुर्ले सुन्न..!
वकील होण्याचं स्वप्न पाहणारी भाग्यश्री, वडिलांची सावली आणि पतीचा आधार आज फक्त आठवण बनली. तिच्या जाण्याने गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पती लक्ष्मणच्या हृदय पिळवटून टाकणार्या आक्रोशाने उपस्थित गहिवरले. नियती किती निर्दयी असू शकते, याची जाणीव देणारी ही घटना गवळी, वंशे कुटुंबासह खोकुर्ले, रविवार पेठ, सनगर गल्ली सुन्न करून गेली.