Ambabai Temple | संगीताचे पोल.. थांबले बोल.. अंबाबाई परिसर झाला अबोल! Pudhari File Photo
कोल्हापूर

Ambabai Temple | संगीताचे पोल.. थांबले बोल.. अंबाबाई परिसर झाला अबोल!

‘म्युझिकल पोल’ची देखभाल यंत्रणा अवघ्या तीन महिन्यांत कोलमडली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला आधुनिक साज चढवणारे अंबाबाई मंदिर परिसरात उभारलेले ‘म्युझिकल पोल’ बंद पडले आहेत. धार्मिक संगीतमय वातावरण निर्मिती करणार्‍या या प्रकल्पाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली होती; मात्र ‘संगीताचे पोल.. थांबले बोल.. अंबाबाई परिसर झाला अबोल’ असे म्हणण्याची वेळ भाविकांवर आली आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी 2 कोटी 85 लाखांचा निधी मिळाला होता. त्याअंतर्गत 120 हेरिटेज पोल उभारण्याचे नियोजन होते. अंबाबाई मंदिर परिसर हा त्याचा पहिला टप्पा होता. पहिल्या काही आठवड्यांत हे पोल पर्यटकांचे आणि भाविकांचे आकर्षण ठरले; मात्र आज या पोलचे लाईट व साऊंड सिस्टीम पूर्णपणे बंद पडले आहे. देखभाल यंत्रणेच्या अभावामुळे अशा संकल्पना केवळ कागदावरच मर्यादित राहत आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

पहिल्या टप्प्यातील म्युझिकल पोल परिसर

मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणपती मंदिर

बिनखांबी ते महाद्वार रोड

शिवाजी चौक ते भवानी मंडप

भवानी मंडप ते बिंदू चौक

प्रकल्पाचा खर्च : 2.85 कोटी

एकूण पोल : 120

सध्या कार्यरत पोल : जवळपास सर्वच बंद

सुरुवातीचा टप्पा : अंबाबाई मंदिर परिसर

आकस्मिक बंदीचे कारण : यंत्रणा बिघाड, देखभाल टाळणे

याला जबाबदार कोण ?

‘म्युझिकल पोल’मधील लाईट व साऊंड सिस्टीम नादुरुस्त झाल्याचे समजते. वारंवार देखभाल आणि व्यवस्थापन आवश्यक असलेल्या अशा प्रकल्पासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा असणे आवश्यक आहे; मात्र याची पुरेशी तयारी न झाल्याने हे संगीतमय पोल आज बंद अवस्थेत आहेत. दर्जाहीन काम याला जबाबदार असल्याची चर्चा भाविकांमध्ये आहे.

विकास की केवळ जाहिरातबाजी?

‘म्युझिकल पोल’ फक्त उद्घाटनापुरतेच मर्यादित राहिल्यामुळे कोल्हापुरातील इतर 120 हेरिटेज पोलचे भवितव्य अधांतरी आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेले हे पोल कमी कालावधीत बंद पडल्याने खरोखर विकासाचा प्रयत्न होता की, केवळ प्रसिद्धीसाठी राबवलेली योजना, असा सवाल आता भाविक, नागरिक करू लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT