‘कराओके’ची स्वरयात्रा... तणावावरची प्रभावी मात्रा Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | ‘कराओके’ची स्वरयात्रा... तणावावरची प्रभावी मात्रा

गृहिणी, व्यावसायिक ते ज्येष्ठांनाही भुरळ; संगीत ठरतेय मानसिक आरोग्यासाठी ’थेरपी’

पुढारी वृत्तसेवा

तानाजी खोत

कोल्हापूर : दिवसभराची धावपळ, जबाबदार्‍यांचे ओझे यामुळे मेंदूला आलेला थकवा याने बेजार झालेला जीव जेव्हा माईक हातात घेतो, तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर वेगळेच तेज येते. तो आत्मविश्वासासोबत गातो अन् सभागृहात सूर घुमतो. ‘पुकारता चला हूँ मै’... हे गाणारा कोणी प्रोफेशनल गायक नसतो, तर असतो एक स्थानिक व्यावसायिक. त्याला दाद देणार्‍यांमध्ये असते एखादी गृहिणी, निवृत्त शिक्षक आणि कदाचित विद्यार्थीही.

हे चित्र आहे, शहरात रुजलेल्या ‘कराओके’ संस्कृतीचे. ताणतणावाखाली दबलेल्या लोकांसाठी ‘कराओके’ एक सूर संजीवनी ठरत आहे. प्रत्यक्ष संवाद हरवत चाललेल्या या काळात कराओकेचे सूर संवादाचे नवे सेतू बांधत आहेत. एकत्र येण्याचे, आनंदी राहण्याचे निमित्त बनत आहेत. मी शासकीय नोकरी करतो, दिवसभर कामाचा ताण, डेडलाईन्सचे टेन्शन यामुळे डोकं जड होतं, काही सुचत नाही. पण आठवड्यातून एकदा आम्ही कराओकेसाठी एकत्र येतो. तिथे सगळा ताण निघून जातो. दोन गाणी म्हटली की, अक्षरशः रिचार्ज झाल्यासारखं वाटतं, असे हेमंत सांगावकर सांगतात. एकटेपणा घालवण्यासाठी ताणतणावाच्या जंगलात हरवलेल्या स्वतःला शोधण्यासाठी अनेक गृहिणी आणि निवृत्त नागरिक कराओके ग्रुप जॉईन करतात, काही घरी सेट घेऊन गाणी गातात.

हाऊसफुल्ल शो, प्रोफेशनल स्टुडिओ

शाहू स्मारक भवन, गोविंदराव टेंबे सभागृह वीकेंडस्ना कराओके कार्यक्रमांसाठी बुक असतात. हौशी गायकांसाठी अनेक कराओके स्टुडिओसुद्धा आहेत. तिथे चांगल्या साऊंड सिस्टीम आणि रेकॉर्डिंगच्या सुविधा हौशी गायकांच्या गाण्याला वेगळ्या उंचीवर नेतात. एखादा डॉक्टर किशोर कुमारचे गाणे गात असतो, एखादी गृहिणी आशा भोसलेंच्या आवाजातील गाण्याला स्वर देत असते. एकमेकांना दाद देणं, चुकलं तरी हसून प्रोत्साहन देणं अशी ही मैफल रंगत जाते.

या वाढत्या ट्रेंडसोबत इलेक्ट्रॉनिक बाजारानेही आपले सूर मिसळले आहेत. वायरलेस माईक्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असलेले पोर्टेबल स्पीकर्स आणि व्होकल रिमूव्हरसारखे फीचर्स असलेली उपकरणे दिल्याने लोकांना घरातच स्टुडिओसारखा फील येत आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी उज्ज्वल जयस्वाल म्हणाले, कराओके आता लोकप्रिय झाला आहे. लोक इको चांगला असलेला माईक कोणता, ब्रँड कोणता हे विचारतात. लहान मुलांसाठीही लोक खरेदी करतात. इतके ते लोकप्रिय आहे. अगदी दोन हजारपासून सव्वा लाखापर्यंत कराओके उपलब्ध आहेत.

कराओके अधिक चांगला पर्याय

विरंगुळा म्हणून रुळलेला ‘कराओके’ लोकांवर मानसिक उपचारही करत आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, तासन्तास मोबाईलवर निरर्थक व्हायरल कंटेंट किंवा टीव्ही पाहण्यापेक्षा कराओके अधिक चांगला पर्याय आहे. गाताना शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ तयार होतात, एकाकीपणा आणि नैराश्य दूर होते. लोकांना ‘सेल्फ रिअलायझेशन’ होतं. जुन्या गाण्यांमुळे लोक त्या त्या काळाशी जोडले जातात. यामुळे स्मृती पेशी सक्रिय होतात व स्मृतिभ्रंशासारखे आजार दूर ठेवता येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT