कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आढावा बैठकीत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ. सोबत अधिष्ठाता सदानंद भिसे व अधिकारी.  
कोल्हापूर

Hasan Mushrif | ‘सीपीआर’ स्वच्छ ठेवा, अन्यथा जाब विचारणार : मंत्री मुश्रीफ

अधिकार्‍यांना इशारा; गैर प्रकारास सुरक्षारक्षक जबाबदार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘सीपीआर’ येथील विविध कामांचे मे अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करणार आहे. त्वरीत कामे पूर्ण करा. सीपीआर स्वच्छ ठेवा, अन्यथा डॉक्टर अधिकार्‍यांना जाब विचारणार. रुग्णालयात गैरप्रकार घडल्यास सुरक्षारक्षकांना जबाबदार धरणार, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असताना बाहेरील लॅबचे एजंट येतात कसे? प्रशासन आणि सुरक्षारक्षक काय करतात, औषधांनी भांडारगृह भरले असून बाहेरून औषधांचा घाट का, असा सवाल उपस्थित करून मुश्रीफ यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शेंडा पार्क येथील वसतिगृह, विश्रामगृह नूतनीकरण, नर्सिंग होस्टेलचा आढावा घेतला. कामे डिसेंबरअखेर पूर्ण करा, अशी सूचना केली. आयुर्वेदिक महाविद्यालय व रुरल ट्रेनिंग सेंटर सांगाव, योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तूर आणि शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय पिंपळगाव येथील कामांचा आढावा घेतला. तेथे पाणी, रस्ता, वीज, एसटीपी प्लांटची कामे प्राधान्याने करा, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले.

अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. गिरीष कांबळे, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले व अधिकारी, कंत्राटदार उपस्थित होते.

शेंडा पार्कात माजी संचालकांची बैठक

शेंडापार्क येथेच गोकुळच्या माजी संचालकांनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये सुमारे दीड तास बैठक सुरु होती. मात्र बैठकीतील तपशील समजू शकला नाही. बैठकीला माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, माजी संचालक बाबासो खाडे, युवराज पाटील, कर्णसिंह गायकवाड, अजित नरके, किसन चौगले, एस. आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, अंबरिष घाटगे आदी उपस्थित होते.

थेट मंत्रालयातील अधिकार्‍यांना फोन

विकासकामांचा आढावा घेताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट बैठकीतून मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण विभाग आणि इतर विभागांतील अधिकार्‍यांना फोन करून निधीअभावी कामे थांबता कामा नयेत, अशी सूचना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT