चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : शेतकरी संघाचा बैल सोडला, तर सगळी सत्ता ही मुश्रीफ यांच्या कागलला, मग बैल तरी कशाला ठेवता म्हणत मुश्रीफ यांचे सख्खे मित्र के. पी. पाटील यांनी सगळ्या संस्थांवर कागलच का? असा प्रश्न उपस्थित केला. लगेचच हसन मुश्रीफ यांनी केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली. त्यापाठोपाठ मुश्रीफ समर्थकांकडून त्यांनी राजीनामा देऊ नये यासाठीची मोहीम सुरू झाली. मुश्रीफ यांची एकहाती सत्ता असलेल्या केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही मुश्रीफ यांनी राजीनामा देऊ नये, असा ठराव करण्यात आला व या विषयावर पडदा टाकला. यातून मुश्रीफ यांनी राजीनामा देतो म्हणत आपली बाजू भक्कम केल्याची चर्चा आहे.
गोकुळ आणि केडीसीसी निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले आहे. गोकुळ व केडीसीसी बँक या जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या आहेत. त्या कधी सैल सोडायच्या व कधी आवळायच्या हे नेत्यांच्या हाती असते. त्यामुळे ज्याच्या हातात या नाड्या तो जिल्ह्याचा नेता अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच या संस्थांच्या वर्चस्वासाठी नेत्यांमध्ये निकराची लढाई होते. निवडणुकीपूर्वीच लाखाचे टोकन चर्चेत येतात; तर दगाफटका टाळण्यासाठी मतदारांना सुखरूप ठेवले जाते. काहीवेळा परदेशवारीही घडते.
या संस्थांचा कारभारच जिल्ह्यावर नियंत्रण मिळवून देतो. सगळा टीकेचा रोख गोकुळ आणि केडीसीसीच्या कारभारावर असतो, यामागे हेच कारण आहे. बँकेचे त्या त्या भागातील निरीक्षक नेत्यांचे डोळे आणि कान असतात, तसेच दूध संघाचे गाववार निरीक्षक डॉक्टर्स हेही तसेच नेत्यांचे डोळे व कान असतात. प्रत्येक गावात, सोसायटी आणि दूध संस्थेत दररोज काय घडले, कोणी घडविले त्याची तपशिलवार हकीकत नेत्यांना याच दोन प्रतिनिधींकरवी समजत असते. त्यामुळे संस्थांच्या कारभारावर व त्या माध्यमातून जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
केडीसीसी बँकेत हसन मुश्रीफ यांची एक हाती सत्ता आहे. ती त्यांनी कायम राखण्यात यश मिळविले आहे. हसन मुश्रीफ कागलचे आमदार व राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री. त्यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष. त्यांचेच कार्यकर्ते सूर्यकांत पाटील कोल्हापूर बाजार समितीचे सभापती झाले. तेथूनच सगळी पदे कागलला का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. गोकुळमध्येही अरुण डोंगळे यांनी अचानकपणे राजीनामा द्यायच्या वेळीच महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तरच राजीनामा देतो, असे सांगण्यामागे त्यांचा बोलविता धनी कोण? याची चर्चा आजही राजकीय वर्तुळात आहे.
कागलच्या राजकीय वर्चस्वाची चर्चा सुरू होताच मुश्रीफ यांनी स्वत:च राजीनाम्याची तयारी दाखविली. त्यापाठोपाठ मुश्रीफ यांनी राजीनामा देऊ नये, अशी मोहीम सुरू झाली. त्याला पूर्णविराम मिळाला. मुश्रीफ यांची सत्ता कायम राहिली, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या व गोकुळ, केडीसीसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडेच या दोन्ही संस्थांची सूत्रे राहिली आहेत.