मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Minister Hasan Mushrif | शक्तिपीठला विरोध असल्यास शेतकर्‍यांनी भेट घ्यावी : मुश्रीफ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघांतून जाणार्‍या शक्तिपीठ महामार्गाला तेथील शेतकर्‍यांचा विरोध असल्यास त्यांनी माझी भेट घ्यावी. जिल्ह्याचा नेता म्हणून त्या शेतकर्‍यांच्याही पाठीशी राहणार आहे. त्यांच्याही भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेत प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाचे अलाईनमेंट बदलले. हा बदल निश्चित आहे का नाही, हे माहीत नाही; पण हा महामार्ग कागलमधून जाणार नाही. ज्या भागातून जाणार आहे त्या भागातील नेते, शेतकरी यांची काय भूमिका आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. चंदगडच्या आमदारांनी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी तो रस्ता चंदगडमधून नेला आहे.

चंद्रकांत पाटील मुक्त विद्यापीठ

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कणेरीमठ येथे केलेले वक्तव्य मी ऐकलेले नाही. पण, ते मुक्त विद्यापीठ असल्याची कोपरखळी मुश्रीफ यांनी लगावली.

राऊतांनी त्यांचे खासदार सांभाळावेत

अजित पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही. खासदार संजय राऊत यांनी आमची चिंता करू नये. त्यांनी शिवसेनेचे खासदार सांभाळावेत, असे प्रत्युत्तर मुश्रीफ यांनी दिले. सर्व नेत्यांनी सहकार्य करून बारामतीची जागा बिनविरोध करावी, असे आवाहन केले. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्तबगार महिलेची नियुक्ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करतील, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

गोकुळ बिनविरोध, योग्यवेळी बोलू

गोकुळची निवडणूक बिनविरोध करावी, अशी संचालकांची भावना आहे. यासंदर्भात योग्यवेळी बोलू, असे मुश्रीफ यांनी सांगितले. गोकुळची चौकशी समिती ही प्रशासकीय प्रक्रिया आहे. नियमबाह्य संस्था अपात्र ठरतील. पात्र संस्था मतदान करतील. एका रात्रीत अधिकारी बदलला म्हणून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे असे नाही. गोकुळवर महायुतीची सत्ता आहे. मुख्यमंत्री काहीही करणार नाहीत, याची खात्री असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT