कोल्हापूर : गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्यचे माजी संचालक बाहेर पडत असताना भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे निवडणूक कार्यालय परिसरात आले. समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना माजी अध्यक्ष मुश्रीफ यांनी पाटील यांना सोबत घेत 'महायुती पूर्ण झाली, फोटो घ्या...' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली अन् फोटोसाठी एकच झुंबड उडाली.
गोकुळ निवडणुकीत महायुतीअंतर्गत वाद आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य यांचे एकत्रित संपर्क दौरे सुरू आहेत. भाजपकडून स्वतंत्रपणे संपर्क दौरे सुरू आहेत. तसेच दूध संस्थांचा पात्र-अपात्रतेचा सुरू असलेला वादही महायुतीअंतर्गतच सुरू आहे. त्यामुळे महायुतीमधील हा वाद आता उघड झाला आहे. मंगळवारीही राष्ट्रवादीचे गोकुळमधील माजी संचालक नवीद मुश्रीफ, वसंत ऊर्फ बाळासो खाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीसह शिवसेना, जनसुराज्यचे संचालक उपस्थित होते. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एका बाजूला आणि भाजप दुसर्या बाजूला हे चित्र स्पष्ट झाले आहे. यावरून महायुतीमधील या भेदाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू असताना मंगळवारी नवीद मुश्रीफ यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासोबत फोटो घेत महायुती पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया देत महायुती म्हणून आम्ही एकच आहोत, असा संदेश दिल्याची चर्चा सुरू होती.