मुरगूड : हुपरी नगरपरिषदअंतर्गत केलेल्या रस्ते कामाचे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय 32, मूळ गाव मिणचे, ता. भुदरगड) याला मुरगूड एस.टी. बसस्थानकावर 40 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
70 लाखांचे बिल देण्यासाठी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात हुपरीचा तत्कालीन नगर अभियंता आणि सध्या मुरगूड नगर अभियंता असलेल्या प्रदीप पांडुरंग देसाई याने ठेकेदाराकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. संबंधित ठेकेदाराने 1 लाख 30 हजार देण्याचे मान्य केले. त्यातील 50 हजार रुपये यापूर्वी अभियंता देसाई याने घेतले. उर्वरित 80 हजारांपैकी 40 हजार आता व रजिस्टर पूर्ण झाल्यावर 40 हजार देण्याचे दोघांत ठरले. सोमवारी 40 हजारांची रक्कम घेऊन संबंधित ठेकेदार नगर अभियंता देसाई याच्याकडे आले. तेव्हा त्याने ही रक्कम मुरगूड एस.टी. बसस्थानकावर थांबवलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले. त्याचवेळी सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडून लाचेची रक्कम व मोबाईल जप्त करीत अभियंता देसाईला मुरगूड पोलिसांच्या स्वाधीन केले.
घरझडतीसाठी पथक तत्काळ त्याच्या घरी रवाना करण्यात आले आहे. घरझडतीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, संदीप काशिद, कृष्णा पाटील व वाहनचालक प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली. पोलिस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर अधिक तपास करीत आहेत.