चंदगड : चुलत बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून जंगमहट्टी ( ता. चंदगड) येथील महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हर्षद हुंदळेकर याचे कीर्तीकुमार कुट्रे याच्या चुलत बहिणीबरोबर प्रेमसंबध होते. त्याच रागातून कीर्तीकुमार याने इन्स्टाग्रामवर कमल खरात या नावाने फेक आयडी काढून त्यावरून आठवड्यापूर्वी हर्षदशी चॅटिंग सुरू केले आहे. शनिवारी रात्रीही त्याला पार्ले येथे कमल खरात या नावाने त्याला बोलावून घेतले. त्याचवेळी पाटणे फाट्यावरून किट आणतो, असे सांगून हर्षद आपल्या एका मित्राला घेऊन पार्लेला गेला. तिथेही गेल्यावर तू एकटाच ये, असा मेसेज त्याला आला. त्यानंतर मित्राला तेथेच थांबवून हर्षद पुढे गेला. त्यानंतर कीर्तीकुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला जबर मारहाण केली. डोकीवर वर्मी घाव बसल्याने हर्षद जागेवरच कोसळला. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह चारचाकी गाडीत घालून स्वप्नवेलजवळील दरीत टाकला.
बुधवारी स्वप्नवेल दरीमध्ये शोध मोहिमेमध्ये मृतदेह आढळून आला नाही. गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम घेण्यात येणार आहे. बुधवारी ड्रोन, फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक दाखल होऊन प्रयत्न केले. मात्र, तिलारीनगर परिसरात दाट धुके व अंधुक प्रकाश यामुळे शोध लागला नाही. गुरुवारी सावंतवाडी येथील बाबुलाल अल्मेडा रेस्कू टीम तपास करणार आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील, पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी भेट देऊन तपास गतिमान केला आहे.