जयसिंगपूर : व्हॉटस् अॅप ग्रुपवर कमेंटवरून झालेला वाद मिटविण्यासाठी बोलावून चाकूने सपासप वार करत जयसिंगपूर येथील साहिल झाकीर काझी (वय 29, रा. गल्ली नं. 13, मच्छी मार्केटजवळ, जयसिंगपूर) तरुणाचा खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या 4 तासांत संशयित राजू लक्ष्मण कांबळे (रा. शाहूनगर, समडोळी मळा, जयसिंगपूर) याला म्हैसाळ (ता. मिरज, जि. सांगली) येथून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद आसिफ झाकीर काझी याने जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे जयसिंगपूर शहरात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
साहिल काझी आणि संशयित राजू कांबळे यांच्यामध्ये गाडीच्या कर्जाचे हप्ते भरण्यावरून जुना वाद सुरू होता. याच वादातून काही दिवसांपूर्वी व्हॉटस्अॅप ग्रुपवर एकमेकांना उद्देशून काही कमेंटस् करण्यात आल्या होत्या. या कमेंटस्चा तीव— राग राजूच्या मनात होता. राजूने साहिल आणि मित्र कार्तिक कलकुटगी या दोघांना गुरुवारी दुपारी पोस्टामागे मैदानावर चर्चेसाठी बोलावून घेतले. चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले.
राजूने लपवून ठेवलेला चाकू काढून साहिलवर हल्ला चढवला. छातीवर आणि डाव्या दंडावर चाकूने सपासप वार केले. साहिल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून राजूने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या साहिलला त्याचा मित्र आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र, चाकूचे वार वर्मी आणि खोल लागल्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले. जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिस उपनिरीक्षक इनामदार यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी संशयितास रात्री उशिरा ताब्यात घेतले.