चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत पक्ष, गट, युती, आघाडी, राजकीय शत्रुत्वच नव्हे तर कट्टर राजकीय वैर विसरून नेत्यांनी युती, आघाडी आकाराला आणली. मात्र कट्टर राजकीय वैर विसरून एवढे एकत्र येण्यासारखे काय घडले? हा सामान्यांना पडलेला प्रश्न व बदलत्या राजकीय परिस्थितीत कोणत्या अपरिहार्यतेने आपल्याला एकत्र आणले हे पटवून देण्यात लागणारा वेळ यातून आता नेत्यांनाच निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या भीतीने ग्रासले आहे. जिल्ह्यात एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वत्रच असे घडल्याने नेत्यांनी आता आपली यंत्रणा कामाला जुंपली आहे.
कागल, मुरगूड, गडहिंग्लज, पन्हाळा, मलकापूर, आजरा, चंदगड, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, वडगाव आदी नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये झालेल्या सोयीच्या राजकीय युती, आघाड्यांनी सामान्यांना आश्चर्यचकित केले आहे. यामध्ये कागलला हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्या अकरा वर्षांच्या टोकदार संघर्षानंतर एकत्र येण्याचे कोडे जनतेला अद्याप उलगडलेले नाही. संजय मंडलिक यांनी जमिनींवरील आरक्षण उठविणे व ‘ईडी’तून सुटका होण्यासाठी युती झाल्याचा प्रहार करताच मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला देत ‘फार बोलू नये, नाहीतर बात दूर दूर तक जायेगी’ असे सांगून पलटवार केला. त्यावर मंडलिक यांनी पुन्हा बात कुठपर्यंत जाते आपण पाहू, आपल्यालाही मुश्रीफ यांची अंडीपिल्ली माहीत असल्याचे सांगून नव्या वादाला बत्ती दिली.
जयसिंगपूरमध्ये सतेज पाटील व धनंजय महाडिक यांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मात्र येथे या दोन्ही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप न करता मौन बाळगत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला व आपल्याला कळविल्याचे सांगून मौन धारण केले आहे. इतरत्रही कुरबुरी सुरूच आहेत. गडहिंग्लजला जनता दल व भाजपची युती झाली आहे. ज्यांच्याशी लढाई त्यांच्याशीच युती तर चंदगडला अजित पवार व शरद पवार राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकमेकांची उणदुणी काढत ज्यांच्या पाच-सहा निवडणुकीत प्रचार केला, गुणगान गायले, त्यांनाच पाडा म्हणून नेत्यांनी भाषणे ठोकली. आता तेच एकत्र आले आहेत. कुठे आमदारांना घेरले आहे तर कुठे खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ही तर भावी राजकारणाची नांदी
नगरपालिका व नगरपंचायतीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांवर नगरपालिका व नगरपचायतींच्या निवडणूक निकालाचा परिणाम होणार आहे. याचा जास्त परिणाम हा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर जाणवणार आहे. या निकालानंतर लगेचच होणार्या निवडणुका व तालुका पातळीवरील राजकारणाचा नगरपालिका, नगरपंचायतींवरील प्रभाव यामुळे या निवडणुका म्हणजेच भावी राजकारणाची नांदी समजली जाते.
नेत्यांनी कार्यकर्त्यांना क्रॉस व्होटिंगबद्दल बजावले
युती झाल्यानंतर दोन्ही गटांतील मंडळींची काय चर्चा होते? ती कुणा-कुणाशी होते? त्यांच्या समाजमाध्यमांवर काय कॉमेंटस् असतात? स्टेटस काय असतात? कोण कुणाला भेटतो? यासह अगदी तपशीलवार माहिती दोन्ही गटांतून जमा करून त्यांची देवाणघेवाण केली जात आहे. खास कार्यकर्त्यांवर याची जबाबदार सोपविण्यात आली असून नेमून दिलेल्या गटात क्रॉस व्होटिंग झाल्यास गय करणार नसल्याचा इशारा जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.