कोल्हापूर

कोल्हापूर : कामे रस्ते, पाईपलाईनची… मार्केटिंग इच्छुकांचे

Arun Patil

कोल्हापूर, आशिष शिंदे : महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता धरून इच्छुकांचे गल्लोगल्ली मार्केटिंग सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते, चॅनल आणि पाईपलाईनची कामे मार्गी लावली जात आहेत. या कामांच्या प्रारंभाचे फलक लावून आणि नेत्यांना बोलावून दणक्यात कार्यक्रम करून इच्छुकांनी आपले मार्केटिंग सुरू केले आहे. त्याला लाखोंचा निधी आणल्याचा व त्यातून होणार्‍या कामांच्या यादीची डिजिटल फलकाद्वारे जोड दिली जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेची मुदत 15 नोव्हेंबर 2021 रोजी संपली. तेव्हापासून प्रशासक कारकीर्द सुरू आहे. महापालिकेच्या मावळत्या सभागृहात महाविकास आघाडीची सत्ता होती. कोल्हापूर शहरात उत्तर व दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघांचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे. सध्या काँग्रेसच्या आमदारांच्या बजेटमधून तसेच पूर्वीच्या नियोजनातील काही कामे आता सुरू आहेत.

विशेतः रस्ते आणि पाईपलाईन तसेच चॅनलच्या कामांचा गल्लोगल्ली धडाका सुुरू आहे. यातून ज्या लोकप्रतिनिधींच्या निधीतून ही कामे हाती घेण्यात आली आहेत, त्यांच्या तसेच त्या – त्या प्रभागातील संबंधित पक्षांच्या इच्छुकांना बोलावून या विकास कामांचे नारळ फोडले जात आहेत. यातून इच्छुकांचे मार्केटिंग सुरू आहे.

या कार्यक्रमांचे फलक लावून प्रभागातील नागरिकांना आग्रहाने निमंत्रित करून मंडळांची आठवण ठेवून आगामी महापालिका निवडणुकीसाठीची जोडणी केली जात आहेत. त्यामुळे शहरात निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. मतदारराजाला साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक लांब असली, तरी माहोल तयार केला जात आहे.

बदललेल्या प्रभागात इमेज बिल्डिंग

जुन्या प्रभांगांची रचना आता बदलली आहे. नवे प्रभाग आता अस्तित्वात आले आहेत. त्या-त्या प्रभागातील इच्छुकांनी नव्याने आकाराला आलेल्या प्रभागात आपली इमेज बिल्डिंग सुरू केले आहे. मंडळांच्या कट्ट्यांवर इच्छुकांचा वावर वाढला आहे. निवडणूक जवळ आली हे समजण्यासाठी हे चित्र पुरेसे बोलके आहे.

SCROLL FOR NEXT