डॅनियल काळे
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, 12 ऑगस्टला प्रारूप जिल्हाधिकार्यांकडे सादर होणार आहे. निवडणूक पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीनुसार होणार असल्याने राजकीय गणिते पूर्णतः बदलली आहेत. बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे व्याप्ती वाढली आहे. आव्हान मोठे आहे. त्यामुळे आकाराला येणारा प्रभागच एखाद्याचे राजकीय भविष्य घडवू शकतो किंवा बिघडवूही शकतो, अशी शक्यता आहे.
सत्ताधार्यांकडून प्रशासनावर प्रभाग रचना हवी तशी घडवून आणण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. विरोधी पक्षांकडून प्रभाग रचना नियमबाह्य झाली तर आंदोलन करू, असा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे प्रशासन दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडले आहे.
नवीन रचनेत एकाच प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामुळे प्रभागाचा आकार, लोकसंख्या आणि सामाजिक समीकरणही मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. यामुळे माजी नगरसेवक, संभाव्य उमेदवार, इच्छुक कार्यकर्ते यांची धाकधूक वाढली आहे. आपल्या संपर्काचा भाग तुटला, तर संधीही तुटते, हे जाणून काही मातब्बर प्रभाग रचना अनुकूल कशी राहील यासाठी हालचाली करत आहेत.
राजकीय ताकद वापरून प्रभाग रचनेत सोयीस्कर बदल घडवून आणण्याचे प्रकार नवे नाहीत. आतादेखील काही सत्ताधारी, प्रभावशाली माजी नगरसेवक अनुकूल भाग स्वतःच्या प्रभागात येईल यासाठी यंत्रणेवर दबाव आणत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिस्पर्ध्यांचा संपर्क असलेल्या भागांचे तुकडे करून त्यांची ताकद कमी करणे आणि आपल्याला पोषक भाग आपल्या प्रभागात आणणे, असा स्पष्ट डाव रचला जात आहे.
नव्या प्रभाग रचनेनंतर अल्पसंख्याक, मागास वस्त्यांचा समावेश असलेले प्रभाग कोणत्या पक्षाला फायद्याचे ठरतील, याचाही अभ्यास सुरू आहे. त्या अनुषंगानेच काहींनी सध्या पक्ष प्रवेश थांबवले असून, प्रभाग स्पष्ट झाल्यावरच आपली ‘राजकीय दिशा’ निश्चित करणार आहेत.