पंकज चव्हाण
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शहरातील राजकीय वातावरण जितके उत्साही होते, तितकेच भावनिक चित्र सोशल मीडियावर दिसून आले. निकाल जाहीर होताच विजयी व पराभूत अशा दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मीडिया माध्यमांवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. आनंद, अभिमान, रोष, खंत अशा विविध प्रतिक्रिया दिवसभर सोशल मीडियावर झळकत राहिल्या.
विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोषात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. ज्यांना ज्यांना वाटत होणार नाय.. करणार नाय.. केलंय बघ, द गेम चेंजर, कट्टर तर कट्टर, आले किती गेले, किती संपले भरारा, घासून नाही ठासून आला, वादळातील दिवा अशा भन्नाट व जोशपूर्ण कॅप्शनसह रील्स, स्टेटस आणि स्टिकर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होते. अनेकांनी विजयाच्या क्षणांचे व्हिडीओ शेअर करत आपला उमेदवार किती मेहनतीने निवडून आला याचा अभिमान व्यक्त केला. काही ठिकाणी फटाके, गुलाल, ढोल-ताशांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर झळकत होते.
दिवसभर शहरातील 65 विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर उत्साहाचे प्रदर्शन सुरू होते. समर्थकांनी आपल्या नेत्यांचे फोटो, विजयी चिन्हांसह पोस्ट शेअर करत भावाने ठरवलं एका रात्रीत वातावरण फिरवलं, कितीबी समोर येऊद्या त्यांना एकटा बास अशा संवादात्मक ओळी वापरून प्रतिस्पर्ध्यांना टोले लगावले. त्यामुळे सोशल मीडियावर राजकीय चर्चांना वेग आला होता. मात्र दुसरीकडे 165 पराभूत उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा स्पष्टपणे दिसून आली. पैशासमोर काय चालणार, प्रामाणिकपणाला हरवावं लागलं, लढा संपलेला नाही अशा प्रतिक्रिया पोस्ट, स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त होत होत्या. काहींनी शांतपणे जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करत पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर काही पोस्टमधून व्यवस्थेवर व प्रचारातील खर्चावर अप्रत्यक्ष टीकाही करण्यात आली.