प्रवीण मस्के
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आली आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरल्या जाणार्या साहित्याचे दर महापालिका निवडणूक यंत्रणेने जाहीर केले आहेत. चहा 7 रुपये, वडापाव 20 रुपये, शाकाहारी साध्या जेवणासाठी 70 रुपये तर मांसाहारी जेवणासाठी 140 रुपये दर निश्चित केला आहे.
महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष व उमेदवार प्रतिनिधींसमवेत 19 डिसेंबर रोजी बैठक झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली दरसूची महापालिका निवडणुकीसाठी वापरण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार निवडणूक खर्च परीक्षण व व्यवस्थापन समितीच्या नियंत्रण अधिकारी तथा मुख्यलेखा परीक्षा कलावती मिसाळ यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
प्रचार करताना उमेदवाराने चहा पाजल्यास 7 रुपये, बिस्कीट 5 रुपये, कॉफी 10 रुपये, कोल्ड्रींक 20 रुपये दर ठरला आहे. प्रचार सभा व रॅलीसाठीचा खर्च निश्चित केला आहे. यात सार्वजनिक सभेसाठी मंडप (प्रती चौरस फूट) 10 रुपये, प्लास्टिक खुर्ची 8 रुपये, व्हीआयपी खुर्ची 110 रुपये, एअर कूलर 450 रुपये, मैदान भाडे प्रतिदिन 7 हजार रुपये, सांस्कृतिक मंगल कार्यालय शहरी भागासाठी (एक तास) 12 ते 18 हजार रुपये असणार आहे.
प्रचार फ्लेक्स पेस्टिंग अँड डिझाईन (प्रति चौरस फूट) 7+2 रुपये, साधा झेंडा 12 रुपये, साधी कापडी टोपी 7 रुपये (प्रति नग), मफलर (प्रति नग) 10 रुपये, बिल्ले (प्रति नग) 2 रुपये, मुखवटे (प्रतिनग) 40 रुपये असणार आहेत. प्रचार प्रसिद्धी साहित्यासाठी हँडबिल, पॅम्प्लेट, फोल्डर, स्टिकर्स दुचाकी, ऑटो रिक्षा, प्रवासी बस जेसीबी यांचे दर ठरले आहेत.
लेझीम, झांज, बँजो पथक 500 ते दोन हजार (प्रति व्यक्ती)
माईक प्रतिनग 300 रुपये, आर्किटेक्चर गटे (कापडी साहित्य) प्रतिदिवस 2700 रुपये, बॉक्स गेट 5 हजार 400, पुष्पगुच्छ (मोठी साईज) 100 ते 350 रुपये, हार-तुरे 20 रुपयांपासून 250 रुपये, फेटे-शाल प्रतिनग 50 ते 100 रुपये, फटाके 300 ते 1500, पोवाडा, हलगी, लेझीम, झांज, बँजो पथक, तुतारी वादन, पथनाट्य पथक (प्रति व्यक्ती) 500 ते 2000 हजार रुपयांपर्यंत दर निश्चित केले आहेत.