कोल्हापूर; टीम पुढारी : जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींसाठी होणार्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत लढत होणार, असे अपेक्षित असतानाच दोन्हीकडील पक्षांनी युती व आघाडीला तिलांजली देत परस्परविरोधी पक्षांशी संधान साधत पॅनेल केली आहेत. जेथे जमले नाही तेथे बंडखोरीही झाली आहे. मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी सोयीस्कर भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचेच अनुकरण केले आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा विचका झाला असून सर्वच राजकीय पक्षांत गोंधळाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणत नेत्यांच्या सोयीच्या भूमिकेत कार्यकर्त्यांचा बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुश्रीफ-घाटगे युती पचनी पडणार की, मंडलिकांना संजय घाटगे तारणार
कागलच्या राजकारणाने जिल्ह्याला थक्क केले आहे. कालपरवापर्यंत एकमेकांवर तोंडसुख घेत परस्परांचे वस्त्रहरण करणारे हसन मुश्रीफ व समरजित घाटगे एकत्र आले आहेत. राजकाणाला धक्का देणार्या या घटेनने माजी खासदार संजय मंडलिक यांना एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. भाजपचे माजी आमदार संजय घाटगे यांची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही; मात्र मुश्रीफ व घाटगे एकत्र आल्याने त्यांना आता कोणाच्या राजकीय कुबड्यांची गरज राहिलेली नाही. आता मुश्रीफ व घाटगे युती जनतेच्या कशी पचनी पडणार व मंडलिक व संजय घाटगे कशाप्रकारे त्यांना आव्हान देणार, त्यावर येथील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
विनय कोरे यांना धक्का
बिनविरोध नगरपालिकेचे स्वप्न पाहणार्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांना पन्हाळ्याने चांगलाच राजकीय धक्का दिला आहे. या नगरपालिकेत कोरे यांचे एकहाती वर्चस्व होते; मात्र आता आपल्याला अंधारात ठेेवून कोणी धक्का दिला, याचा शोध घेण्याची वेळ विनय कोरे यांच्यावर आली आहे. सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये तीन जनसुराज्यचे, दोन भोसले गट व एक मोकाशी गट असे संख्याबळ असून जनसुराज्य, मोकाशी गट व भोसले गट विरुद्ध अपक्ष अशी लढत होत आहे.
सगळेच रिंगणात
हातकणंगले येथे बहुतेक सगळ्याच प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांना रिंगणात उतरविल्याने बहुरंगी लढती होत आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे तेथे प्रत्येक नेत्याची कसोटी लागणार आहे.
बहुरंगी लढत
हुपरीत भाजप, शिवसेना, मनसे, शरद पवार राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची अंबाबाई विकास आघाडी विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना, काही अपक्ष व हिंदू महासभेच्या उमेदवारांमुळे बहुरंगी लढत होत आहे. तेथेही गटातटात विभागलेल्या राजकारणावरच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जनता दलाची भाजपला साथ
गडहिंग्लजमध्ये अनपेक्षित घडामोडीत भाजपला जनता दलाने साथ दिली आहे. तेथे जनसुराज्य शक्ती, जनता दल, भाजप, शिवसेना विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी असा महायुतीतच सामना होत आहे. हसन मुश्रीफ यांना येथे एकाकी लढत द्यावी लागणार असून उद्धव ठाकरे शिवसेना स्वतंत्र लढत आहे. येथे अपक्षांमुळे डोकेदुखी वाढली असून राजकीय पक्ष व नेते चिंतेत आहेत.
मुश्रीफ-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
चंदगडला वादविवाद टाळून महायुती म्हणून भाजप व शिंदे शिवसेनेला एकत्र आणण्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार शिवाजीराव पाटील यांना यश आले आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेसप्रणीत शाहू विकास आघाडी अशी लढत आहे. तेथे हसन मुश्रीफ विरुद्ध शिवाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ठाकरे शिवसेनेची यड्रावकरांना साथ
कुरुंदवाडला उद्धव ठाकरे शिवसेना राजर्षी शाहू विकास आघाडीबरोबर आहे. विरोधात भाजप, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोट बांधली आहे. पक्षातील फाटाफूट व पक्ष, संघटना गुंडाळून ठेवत जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना मतदारांना आपली भूमिका कशी योग्य आहे, ते पटवून द्यावे लागेल.
पारंपरिक संघर्षात मराठा सेनाही
वडगावमध्ये सालपे व यादव या पारंपरिक गटांत लढत होत आहे. जनसुराज्य प्रणीत सालपे, तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांची यादव गटाला साथ मिळाल्यामुळे राजकीय द़ृष्ट्या महायुतीत फूट पडल्याचे दिसत आहे; मात्र वडगावचे राजकारण नेहमीच गटातटाचे असल्याने नेत्यांची प्रतिष्ठाही गटाच्या नेत्यांवरच अवलंबून आहे. सकल मराठा सेनाही येथे ताकद अजमावत आहे.
पाटील विरुद्ध महाडिक
आजर्यात आ. सतेज पाटील विरुद्ध खा. धनंजय महाडिक यांच्या समर्थकांतच राजकीय संघर्ष होणार आहे. महाडिक गटाच्या वतीने अशोक चराटी यांनी ताराराणी आघाडी केली असून काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी आपल्या चिन्हावर लढत आहेत. अन्याय निवारण समिती व भाजपचे जुने कार्यकर्ते यांची तिसरी आघाडीही मैदानात आहे. येथे हसन मुश्रीफ यांची साथ कोणाला मिळणार, हाच प्रश्न आहे.
आ. राजेंद्र यड्रावकरांना घेरले
शिरोळला आमदार राजेंद्र पाटील यांना सर्वपक्षीय विरोधकांनी घेरले आहे. त्यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीविरोधात भाजप प्रणीत ताराराणी आघाडी, शिवसेना, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना असे परस्परविरोधी विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. यादव यांचे पॅनेलही रिंगणात आहे. त्याचा फटका कुणाला बसणार व फायदा कुणाला होणार, हे प्रचाराचे वातावरण तापल्यावर स्पष्ट होईल.
भाजप - काँग्रेस एकत्र
जयसिंगपूर शहरात भाजप व काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची अनपेक्षित घटना घडली आहे. ‘आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विरोध’ या एकमेव सूत्रावर हे सर्व एकत्र आले आहेत. तेथे काँग्रेस व भाजपला शरद पवार यांची राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ आहे. पक्ष, संघटना व विचार सगळेच गुंडाळून ठेवत ही आघाडी झाली आहे. आता जनतेला हे सगळे पटवून देण्यात उमेदवार व नेत्यांची कसोटी आहे. आ. सतेज पाटील व महाडिक गट स्वाभिमानीच्या साथीने एकत्र आले आहेत.
युती विरुद्ध आघाडी अशीच लढत
मलकापुरात युती विरुद्ध आघाडी असा सामना आहे; मात्र अजित पवार गटाने महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. जनसुराज्यचे विनय कोरे, भाजप व राष्ट्रीय दलित महासंघ विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील, अजित पवार राष्ट्रवादीचे रणवीर गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्ष एकत्र आहेत. विनय कोरे यांच्या मतदारसंघात त्यांना आव्हान उभारण्याचे प्रयत्न असल्याने तेथे कोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
मुरगूडमध्ये कागलच्या राजकारणाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. येथे मंडलिक गटाचे राजेखान जमादार मुश्रीफ गटात व मुश्रीफ गटाचे प्रवीण पाटील मंडलिक गटात अशी नवी राजकीय स्थिती आहे. कागलला मुश्रीफ व घाटगे एकत्र आल्याने मुरगूडला काय होणार, याची उत्सुकता आहे. येथे मंडलिक गट विरुद्ध मुश्रीफ - घाटगे गट अशी लढत होणार आहे.