Municipal Council Election Result 2025 |आठ पालिका, तीन पंचायतींवर ‌‘महायुती‌’चा झेंडा file photo
कोल्हापूर

Municipal Council Election Result 2025 |आठ पालिका, तीन पंचायतींवर ‌‘महायुती‌’चा झेंडा

मविआकडे केवळ दोन पालिका : शिंदे शिवसेना 4, भाजप 3, राष्ट्रवादी 2, जनसुराज्य 2

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचा झंझावात राहिला. 10 पैकी 8 नगरपालिकांवर आणि तीनही नगर पंचायतींवर महायुतीने सत्ता मिळवत विजयाचा झेंडा फडकवला. महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. त्यांना केवळ दोनच नगरपालिकेवर सत्ता मिळवता आली. जिल्ह्यात 13 पैकी महायुतीतील भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, जनसुराज्य शक्तीचे दोन, शिवसेनेचे दोन तर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे दोन असे 11 नगराध्यक्ष झाले. जिल्ह्यात मिळालेल्या या दणदणीत विजयाने महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे; तर महाविकास आघाडीला जिल्ह्यातील 2 महापालिकांसाठी कंबर कसावी लागणार आहे.

राज्यात महायुतीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलची सत्ता अबाधित ठेवली तर गडहिंग्लजमध्ये सत्तांतर घडवत एकतर्फी विजय मिळवला. चंदगडमध्ये भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी सत्तांतर घडवले. आजर्‍यात भाजपच्याच ताराराणी आघाडीने वर्चस्व मिळवले. मुरगूडमध्ये मुश्रीफ यांना धक्का देत शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिक यांनी एकतर्फी विजय मिळवला. हातकणंगलेत शिवसेनेने विजयाचा झेंडा फडकावला. पन्हाळा आणि मलकापुरात आमदार डॉ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्तीने आपली सत्ता कायम ठेवली. हुपरीत आमदार राहुल आवाडे यांनी कंबर कसत भाजपला एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना भुईसपाट केले. जयसिंगपुरात आपली सत्ता आबाधित ठेवत कुरुंदवाडमध्येही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपला करिश्मा दाखवला. शिरोळ आणि वडगावमध्ये आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचा वारू रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळवून दिले.

कागल मुश्रीफ आणि घाटगेंचे

कट्टर विरोधक असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि छत्रपती शाहू आघाडीचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी निवडणुकीत केलेल्या युतीला कागलच्या जनतेने एकतर्फी कौल दिला. नगराध्यक्षपदासह सर्व 23 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करत कागल मुश्रीफ आणि घाटगे यांचे असल्याचे दाखवून दिले. राज्यात एकत्र असलेल्या आणि निवडणुकीत विरोधात आव्हान दिलेल्या शिवसेनेचे माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह विरोधकांना मोठा धक्का देत कागल नगर परिषदेवर एकतर्फी सत्ता कायम ठेवली.

‘जनसुराज्य’ पन्हाळ्याचा शिलेदार

पन्हाळा नगर परिषदेवर जनुसराज्य शक्तीने आपले वर्चस्व कायम ठेवत आपणच शिलेदार असल्याचे दाखवून दिले. नगराध्यक्ष पदासह 20 सदस्यांपैकी भाजपसमवेत 11 जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता ताब्यात ठेवली. भाजपने दोन जागांवर विजय मिळवत खाते उघडले. जनसुराज्यला 9 जागा मिळाल्या. पन्हाळकरांनी चार अपक्षांनाही कौल दिला. यासह विरोधी शिवशाहू विकास आघाडीला दोन आणि शाहू महाआघाडीला तीन जागा मिळाल्या.

मलकापूर : जनसुराज्यने सत्ता राखली

मलकापूर नगर परिषदेत जनसुराज्य शक्तीने दलित महासंघ, भाजपसोबतच्या महायुतीद्वारे आपली सत्ता कायम ठेवली. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या 20 जागापैकी 12 जागा जिंकत पालिकेच्या सत्तेची चावी आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले. प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 7 जागांवर यश मिळवता आले. एका अपक्षानेही विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी संघटनेला खातेही उघडता आले नाही.

वडगावात यादव गटाची सरशी

वडगाव नगर परिषदेत महाविकास आघाडीच्या यादव गटाची सरशी झाली. सत्ताधार्‍यांचा एकतर्फी पराभव करत यादव गटाने सत्तांतर घडवून आले. नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 15 जागांवर विजय मिळवत यादव गटाने वडगाववर आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. प्रतिस्पर्धी सालपे गट जनसुराज्य शक्ती, ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेला होता, मतदारांनी त्यांच्या पारड्यात पाच जागा दिल्या.

हुपरी : महायुतीचा एकतर्फी विजय

हुपरीत महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत सत्ता कायम ठेवली. नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या 21 जागांपैकी 19 जागा महायुतीने जिंकत हुपरीवरील आपले निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले. भाजपने 15 जागांवर दणदणीत विजय मिळवला. सोबत असणार्‍या शिवसेनेनेही चार जागांवर विजय मिळवला. विरोधी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी संघटनेला खाते उघडता आले नाही. मात्र त्यांच्या सहयोगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र दोन जागांवर विजय मिळवला.

कुरुंदवाड : आ. यड्रावकरांचा झेंडा

कुरुंदवाड नगर परिषदेत सत्तांतर घडवत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सत्तांतर घडवले. त्यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने नगराध्यक्षपदाची जागा आणि नगरसेवकांच्या एकूण 20 पैकी 12 जागा जिंकत नगर परिषदेवर झेंडा फडकावला. गतवेळची सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपला मात्र या निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

हातकणंगलेत शिवसेनेची बाजी

हातकणंगले नगर पंचायतीत सर्वच पक्षांनी स्वबळाचा शड्डू ठोकला होता. त्यात शिवसेनेने बाजी मारली. नगराध्यक्षपदावर निर्विवाद विजय मिळवत नगरसेवकांच्या 17 जागांपैकी सर्वाधिक सहा जागांवरही विजय मिळवला. प्रतिस्पर्धी काँग्रेसला पाच, भाजपला दोन जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. पक्षीय उमेदवारांच्या गर्दीत तीन अपक्ष उमेदवारांनी विजय खेचून आणत नगर पंचायतीत प्रवेश केला.

आजर्‍यात ताराराणी आघाडीला यश

आजरा नगर पंचायतीत ताराराणी आघाडीने यश मिळवले. नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवत, नगरसेवकांच्या 17 पैकी 8 जागांवरही विजय मिळवत सत्ता कायम ठेवली. प्रतिस्पर्धी काँग्रेसप्रणीत आघाडीला 6 जागा जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला एका जागेवर विजय मिळवता आला. अन्याय निवारण समिती आघाडीने दोन जागांवर विजय मिळवत नगर पंचायतीतील प्रवेश निश्चित केला.

चंदगडच्या चाव्या भाजपकडे

चंदगड नगर पंचायतीत सत्तांतर करत सत्तेच्या चाव्या भाजपकडे आल्या. नगराध्यक्ष पदाच्या विजयासह नगरसेवकांच्या एकूण 17 जागांपैकी भाजपने 8 जागांवर विजय मिळवला. गतवेळेचे सत्ताधारी, प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत राजर्षी शाहू विकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावे लागले. एका अपक्षानेही विजय मिळवला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभा घेतल्याने या निवडणुकीकडे सार्‍यांचे लक्ष होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT