Kolhapur municipal corporation Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur Municipal Corporation | ड्रेनेज घोटाळा : तपास अंतिम टप्प्यात

महापालिकेतील 80 लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी लवकरच दोषारोपपत्र

पुढारी वृत्तसेवा

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेला हादरवून सोडणार्‍या 80 लाख रुपयांच्या ड्रेनेज घोटाळ्याचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू असून, बिलावर डोळे झाकून सह्या केलेल्या आणि नंतर त्या सह्या आमच्या नव्हेच, असा दावा करणार्‍या अधिकार्‍यांच्या सह्यांचे नमुने तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून, या अहवालानंतर संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांच्या सह्या या प्रकरणात निर्णायक ठरणार आहेत.

कसबा बावडा परिसरातील ड्रेनेज लाईन कामाच्या नावाखाली सुमारे 80 लाख रुपयांचे बिल काम न करताच उचलल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. शिवसेनेचे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी हा घोटाळा उघडकीस आणताच महापालिकेत खळबळ उडाली होती.

या प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांनी बिलावरील सह्या आपल्या नसल्याचा दावा करत, बनावट सह्यांचा आरोप केला आहे. दुसरीकडे, ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यानेही कोणत्या अधिकार्‍याने किती रक्कम घेतली, याची यादीच जाहीर करून प्रकरण अधिकच चिघळवले. याशिवाय एका महिला अधिकार्‍याने ‘गुगल पे’द्वारे रक्कम स्वीकारल्याचा कथित स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

जून 2025 मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी केला आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून या गुन्ह्याची विविध पाळेमुळे त्यांनी खणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सह्यांच्या तपासणीचा अहवाल मिळताच दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे श्रीराम कण्हेरकर यांनी सांगितले.

कोण अडकणार कोण सुटणार?

दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. नियमांनुसार हस्तलिखित एमबी (मेजरमेंट बुक) आवश्यक असताना, टाईप केलेल्या एमबीच्या आधारे बिल अदा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे महापालिकेतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यामागील जबाबदार कोण, याचा उलगडा पोलिस तपासातून होणार आहे. संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या या घोटाळ्यातून नेमके कोण अडकणार आणि कोण सुटणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT